
महाराष्ट्रातील अनेक भागांत सोमवारी रात्री अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. मंगळवारीसुद्धा वातावरणात बदल झाला असून ढगाळ वातावरणामुळे तापमान घसरले आहे. दरम्यान, मंगळवारी १३ मे रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे, गारपिटीसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला आहे.
पुणे परिसरात अनेक ठिकाणी पाऊस झाला. उंड्री वडाचीवाडी परिसरात सोमवारी रात्री जोरदार पाऊस झाला.
नाशिकमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसला. नाशिकमध्ये २१ मिमी पावसाची नोंद झाली. हवामान विभागाने नाशिकला ‘यलो अलर्ट’ दिला होता. मात्र, दुपारनंतर परिस्थितीत बदल झाला असून तो ‘ऑरेंज अलर्ट’ करण्यात आला.
परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे केळी पिके आडवी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसल्याचे दिसून येते. उन्हाळी पिके, भुईमूग, हळद आणि आंब्याचे पावसामुळे नुकसान झाले आहे. दोन-तीन दिवसांच्या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झाले आहे.
वाशीमसह जिल्ह्यात सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला आहे. वाशिम जिल्ह्यातील ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे तापमानाचा पारा कमी झाला आहे. वाशिम जिल्ह्याला पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. सर्दी, खोकला, अंगदुखीचा त्रास नागरिकांना होत आहे.
यवतमाळ जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. आर्णी तालुक्यात अवकाळी पावसाने जोर धरला आहे. मंगळवारी आर्णी तालुक्यासह अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे भुईमूग पिकाला काही प्रमाणात फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तहसील अंतर्गत येत असलेल्या चोरपांग्रा येथील 35 वर्षीय महिला रंजना चव्हाण यांचे अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतक रंजना चव्हाण या त्यांच्या चोरपांग्रा शिवारातील शेतात कुटुंबासह कापूस वेचणीसाठी जात होत्या.