ऐन दुष्काळात मुंबईत जोरदार पाऊस! महिन्याभराच्या विश्रातीनंतर अचानक एन्ट्री; कुठे पडला?
मुंबईत महिन्याभराच्या विश्रांतीनंतर अचानक पावसाची एन्ट्री झाली आहे. दादरमध्ये सरी बरसल्यानंतर नागरिकांची पळापळ झाली. तर यामुळेअनेकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

राज्यातील विविध भागातून पावसाने काढता पाय घेतला आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतकरी राजा संकटात सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पिके करपली आहेत. दुसरीकडे मुंबईकर ऑक्टोबर हिटने त्रस्त झाले आहेत. उन्हाचा पारा नागरिकांना झेलावा लागत आहे. याचदरम्यान मुंबईत पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
मुंबईतील दादरसहित विविध परिसरात शुक्रवारी सकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. अनेक दिवसांनंतर दादरमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. मुंबईतील दादरसह विविध परिसरात पाऊस बरसल्याने सकाळी नोकरी आणि जॉगिंग वॉकसाठी निघालेल्या लोकांची काहीशी तारंबळ उडाली. तर काहींनी पावसाचा आनंद लुटला. अनेक जण ऑक्टोबर हिटमुळे त्रस्त झाले होते. त्यामुळे अचानक पावसाने हजेरी लावल्याने हवेत काहीसा गारवा निर्माण झाला.
ऑक्टोबर हिटपासून दिलासा
मुंबईकरांना मागी महिन्यापासून ऑक्टोबर हिटचे चटके बसत होते. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात तापमान थेट 35 अंशाच्या विक्रमी पातळीवर पोहोचले होते. काही भागात तापमानाचा पारा आणखी वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. या तापमानामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने तात्पुरता दिलासा मिळाला आहे. एकंदरित मुंबईत तापमान वाढत असताना सरी बरसल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
चक्रीवादळामुळे हवामानात बदल
अर्णब चक्रीवादळामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे. या चक्रीवादळामुळे तीन दिवस रात्री उशिरा आणि पहाटे हवेत गारवा निर्माण झालाय. त्यामुळे नागरिकांना काही अंशी दिलासा मिळालाय. या अर्णब चक्रीवादळामुळे राज्यावर थेट परिणाम होणार नाही. परंतु वातावरणात मोठे बदल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पावसाचा अलर्ट दिलाय . त्यामुळे तळ कोकण, घाटमाथा, पूर्व विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पाऊस येईल. तसेच ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहणार असून ढगांच्या गडाडाटासह पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आलाय.