आता झाडांची दहशत… मुंबईपासून पुण्यापर्यंत पडझड सुरूच… झाडाजवळून जाताना सावध राहा; कुठे कुठे उन्मळले वृक्ष?

maharashtra rain update : महाराष्ट्राच्या विविध भागात झाड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. झाड कोसळण्याच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातवरण निर्माण झालं आहे.

आता झाडांची दहशत... मुंबईपासून पुण्यापर्यंत पडझड सुरूच... झाडाजवळून जाताना सावध राहा; कुठे कुठे उन्मळले वृक्ष?
| Updated on: Jul 05, 2026 | 11:48 AM

राज्यातील विविध भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची झोप उडवली आहे.  तर मुंबईतील विविध भागात पावसाचे पाणी रस्त्यावर साचलं आहे. या मुसळधार पावसादरम्यान अनेक दुर्घटना देखील घडू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या चेंबूरमध्ये झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दादरमध्ये 100 वर्ष जुने वडाचं झाड कोसळलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात झाड कोसळल्याची घटना घडली आहे. दादरनंतर चेंबूरच्या वामनवाडी रोडवरही झाड कोसळलं आहे. एकीकडे रस्त्यावर उघड्या मॅनहोलचं संकट आहे. तर दुसरीकडे आता झाडांची दहशत निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांपासून झाड कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

घाटकोपरमध्ये मध्यरात्री कोसळलं झाड

मुंबई घाटकोपरमध्ये विक्रांत सर्कलजवळ मध्यरात्री झाड कोसळल्याची घटना घडली. झाड कोसळून वाहनांचे नुकसान झालं. यानंतर घटनास्थळी अग्निशमन दल आणि पालिका प्रशासन दाखल झाले. त्यानंतर झाड बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आलं.

विलेपार्लेमध्ये टेम्पोवर कोसळलं झाड

मुंबईच्या विलेपार्लेमध्ये परिसरात झाड कोसळल्याची घटना घडली आहे. एका टेम्पोवर झाड कोसळलं. यात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. झाड काटेरी असल्यामुळे हटवण्यात अडचणी आल्या. विलेपार्ले अग्निशमन केंद्राच्या समोरच ही घटना घडली. प्रशासनाने झाड हटवण्याचं काम सुरू आहे.

नवी मुंबईत जॉगिंग ट्रॅकवर कोसळलं झाड

नवी मुंबईच्या सानपाडा ते वाशीदरम्यान एक जॉगिंग ट्रॅक आहे. या जॉगिंग ट्रॅकवर दोन दिवसांपूर्वी झाड कोसळलं होतं. हे झाड अद्याप नवी मुबंई उद्यान विभागाने हटवलेलं नाही. जॉगिंग ट्रॅकवर कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला.

रायगडच्या भिसे खिंडीत मातीचा मलबा रस्त्यावर

रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रोहा–नागोठणे मार्गावरील भिसे खिंडीत मातीचा मलबा झाडासह रस्त्यावर कोसळलाय. या घटनेमुळे या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झालाय.

पुण्यात कॉलेज रस्त्यावर कोसळलं झाड

पुणे शहरातील बीएमसीसी महाविद्यालयात रस्त्यावर झाड कोसळल्याची घटना घडली. सकाळच्या सुमारास अचानकपणे हे झाड कोसळले. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

जळगावमध्ये कारवर झाड कोसळले

जळगावातील ममुराबाद रस्त्यावरील सोना नगरात उभ्या कारवर झाड कोसळल्याची घटना घडली. कडुनिंब झाड कोसळल्याने कारच्या मागील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला झालाय. या घटनेवेळी सुदैवाने आसपास कुणीही नसल्याने जीवितहानी टळली. मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेली कार ही धीरज चौधरी यांची असल्याची माहिती समोर आली आहे.

Follow Us