
कोकणातील राजापूर विधानसभेचे माजी आमदार, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते, राजन साळवी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज दुपारी तीन वाजता त्यांचा हा पक्षप्रवेश पार पडणार आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी हे उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा रंगली होती, अखेर आज साळवी हे ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र करणार आहेत. त्यांच्या या निर्णयानंतर माजी खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया देत साळवींवर टीका केली आहे. ते पराभवानंतरच भाजपमध्ये जाण्यासाठी उत्सुक होते, चाचपणी सुरू होती असा दावा विनायक राऊत यांनी केला.
ज्या दिवशी राजन साळवींचा पराभव झाला, त्याच्या दोन-तीन दिवसांतच त्यांनी संपूर्ण मतदारसंघात फिरून आपल्याला आत भविष्य काही दिसत नाहीये, त्यामुळे भारतीय जनता पक्षातच जावं लागेल, असं ते सर्वांना सांगायला सुरूवात केली होती. पण त्यांचं दुर्दैव की भाजपने त्यांच्यासाठी कधीच दरवाजा उघडला नाही, एवढंच नव्हे तर देवेंद्र फडणवीसांनीही कधीच त्यांना भेट दिली नाही. त्यामुळे ते ज्यांच्यांशी आजपर्यंत भांडतच राहिले, ते सामंत कुटुंबिय ज्या पक्षात आहेत ( शिवसेना शिंदे गट) त्यामध्ये आता त्यांना जावं लागतंय. ही त्यांच्यावर ओढवलेली दुस्थिती आहे, अशा शब्दांत विनायक राऊत यांनी राजन साळवींच्या शिवसेना प्रवेशावर प्रतिक्रिया दिली.
साळवींची कॅपॅसिटी किती हे भाजपला माहीत आहे ना, त्यामुळेच त्यांना पक्षात स्थान मिळालं नाही, असं राऊत म्हणाले. प्रत्येक निवडणुकीत कोणाची ना कोणाशी गद्दारी करायची. उदय सामंत यांचा पहिला राजकीय उदय हा राजन साळवींच्या
गद्दारीमुळेच झाला. भाजपचे जे शिंदे गटाचे आमदार आहेत निलेश राणे, त्यांनी वर्षापूर्वी राजापूरच्या चौकात जाहीर आरोप केले होतो की लोकसभेच्या प्रत्येक निवडणुकीत राजन साळवी आमच्याकडून किती पैसे घेतात, हे त्यांनी सांगावं, असे आव्हान त्यांनी केलं होतं. ज्यांच्यावर नेहमी आरोप होत होते, त्यांना भाजप कधीच जवळ करणार नाहीच, त्यांचा उपयोग किती हे भाजपला नेमकं माहीत आहे ना, असा चिमटा विनायक राऊत यांनी काढला.
उद्धव ठाकरेंची साथ का सोडली ?
राजन साळवींकडे एक कडवट शिवसैनिक म्हणून पाहिलं जायचं, मग त्यांनीच उद्धव ठाकरेंची साथ का सोडली ? असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. ” एकदा सत्तेची लालूच लागली, कॉन्ट्रॅक्टरशिपची लालूच लागली की भविष्याकरता त्यांना अशी दुर्बुद्धी सुचते, तसाच हा प्रकार आहे” असा टोला राऊत यांनी लगावला.