
Sambhaji Bhide : माझ्याकडचे आंबे खाल्ल्याने मुलं होतात, असे वक्तव्य कधीकाळी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी विधान केले होते. त्यांच्या या विधानामुळे राज्यभरात त्यांच्यावर सडकून टीका करण्यात आली होती. दरम्यान, आता हेच संभाजी भिडे आता पुन्हा एकदा बरळले आहेत. सर्वधर्मसमभाव हा नपुंसकपणा आहे, असं विधान त्यांनी केलंय. आता त्यांच्या या नव्या विधानाने मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भिडे यांच्या या विधानाची चांगलीच दखल घेऊन निषेध केला आहे. तसेच भिडे यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मोठी मागणी आठवलेंनी केली आहे.
संभाजी भिडे यांच्या सर्वधर्मसमभावावरील विधानानंतर एक्स या समाजमाध्यमावर एक पोस्ट केली आहे. संभाजी भिडे यांचे वक्तव्य केवळ बेजबाबदारच नाही, तर ते थेट भारताच्या संविधानावर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रुजवलेल्या समतेच्या तत्त्वावर हल्ला करणारे आहे. “सर्वधर्मसमभाव म्हणजे नीचपणा” असं म्हणणं म्हणजे भारताच्या लोकशाही आणि संविधानाचा अवमान आहे, अशी थेट भूमिका रामदास आठवले यांनी घेतली आहे.
तसेच, ‘आंबे खाल्ल्याने मूल होतात’ असं विधान पुन्हा करणं हे अवैज्ञानिक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अखेरच्या क्षणांबाबत असत्य विधानं करणं, तसेच “दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवा” म्हणत राष्ट्रीय प्रतीक तिरंग्याचा अपमान करणं—ही सगळी वक्तव्यं महाराष्ट्राची पुरोगामी प्रतिमा देशात आणि जगात मलीन करत आहेत, असा थेट हल्लाबोल रामदास आठवले यांनी केलाय.
पुढे रामदास आठवले यांनी या बेताल आणि अविवेकी वक्तव्यांवर त्वरित कायदेशीर कारवाई व्हावी, अशी थेट मागणी केली आहे. तसेच इतिहासाची मोडतोड करणाऱ्या आणि सामाजिक सौहार्द बिघडवणाऱ्या वक्तव्यांना तातडीने रोखणं गरजेचं आहे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.
संभाजी भिडे यांचे वक्तव्य केवळ बेजबाबदारच नाही, तर ते थेट भारताच्या संविधानावर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रुजवलेल्या समतेच्या तत्त्वावर हल्ला करणारे आहे. “सर्वधर्म समभाव म्हणजे नीचपणा” असं म्हणणं म्हणजे भारताच्या लोकशाही आणि…
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) August 5, 2025
अशा बेताल वक्तव्यांचे परिणाम अतिशय गंभीर असतात. समाजात निर्माण होणारा तिव्र रोष जर वेळेवर हाताळला गेला नाही, तर त्याची किंमत संपूर्ण व्यवस्थेला चुकवावी लागेल. ही सहनशीलतेची कसोटी न घेता, तात्काळ कारवाई केलीच पाहिजे, असा आग्रहदेखील आठवले यांनी धरला आहे. त्यामुळे आता रामदास आठवले यांच्या या भूमिकेनंतर नेमकं काय होणार? सरकार संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
संभाजी भिडे हे नाशिकमध्ये व्याख्यान देत होते. यावेळी व्याख्यानादरम्यान त्यांनी सर्वधर्मसमभाव संकल्पनेवर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सर्वधर्मसमभाव हा ना स्त्री आणि ना पुरूष हा नपुंसक प्रकार आहे. सर्वधर्मसमभाव हा नीचपणा आहे, असं विधान संभाजी भिडे यांनी केलाय. मी बोललो होतो की आंबे खाऊन मुलं होतात. मी आजदेखील आंब्यांचं एक झाड लावलं आहे. ते आंबे तुम्ही खाऊ शकतात, असे वक्तव्य करून त्यांनी त्यांच्या ‘आंबे खाल्ल्याने मुलं होतात’ त्यांच्या या जुन्या विधानाचा एका प्रकारे पुनरुच्चार केला आहे.