व्याजासह उत्तर दिले जाईल, उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीच्या टीझरवर शिंदेंच्या शिलेदाराचा रोखठोक इशारा

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे, येत्या 19 आणि 20 जुलैला ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. या मुलाखतीचं टीझर आता समोर आलं आहे, यानंतर रामदास कदम यांनी पुन्हा एकदा ठाकरेंना इशारा दिला आहे.

व्याजासह उत्तर दिले जाईल, उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीच्या टीझरवर शिंदेंच्या शिलेदाराचा रोखठोक इशारा
| Updated on: Jul 16, 2025 | 3:04 PM

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे, ही मुलाखत येत्या 19 आणि 20 जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. या मुलाखतीचा टीझर नुकताच समोर आला आहे, यावरून पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ज्यांना विधानसभेमध्ये वीस आमदार निवडून आणता आले नाहीत, ते बाळासाहेबांची नक्कल करत आहेत, व्याजासह त्यांचे उत्तर दिले जाईल, असा इशारा यावेळी कदम यांनी दिला आहे.

नेमकं काय म्हणाले कदम? 

चांगलं आहे, संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेत आहेत. ज्याला आपण म्हणतो उंदराला मांजर साक्षी अशी ही मुलाखत आहे. ज्यांना विधानसभेत वीस आमदार निवडून आणता आले नाहीत, ते बाळासाहेबांची नक्कल करत आहेत. हातामध्ये रुद्राक्ष बांधलं म्हणून बाळासाहेब होता येत नाही, हे उद्धव ठाकरे यांना कळलं पाहिजे, त्यांच्या मुलाखतीची वाट पाहात आहे, असं कदम यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, व्याजासह त्यांचे उत्तर दिलं जाईल, त्यांनी उद्याच्या मुलाखतीमध्ये सांगावं, शिवसेनाप्रमुखांच्या मृत्यूनंतर शिवाजी पार्कमधील सभांमध्ये कदमांची भाषणं बंद का केली? हे पण सांगा.  माझी आणि दिवाकर रावते यांची आमदारकी का घालवली? आपल्या नेत्यांना बाहेर काढलं आणि ज्या अपक्षांचा काही संबंध नाही, त्यांना मंत्रिपद दिलं, असा घणाघात कदम यांनी केला आहे.

मनोहर जोशी साहेबांना शिवाजी पार्कच्या मैदानामधून स्टेजवरून खाली उतरायला लावलं. तीच यंत्रणा रंगशारदामध्ये माझ्या बाबतीमध्ये लावली होती, मला एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं भाई तुम्ही येऊ नका, असा गौप्यस्फोटही यावेळी कदम यांनी केला आहे.

टीझर प्रदर्शित 

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत केली आहे, या मुलाखतीमधून अनेक महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. या मुलाखतीचा टीझर नुकताच समोर आला आहे.