भोंदू खरातचे पाय धरणाऱ्या चंद्रकांत पाटलांना…; रवींद्र धंगेकरांनी सवाल करत घेरलं, कुणााचं टेन्शन वाढलं?
रवींद्र धंगेकरांनी भाजपला सवाल करत घेरलं आहे. रविंद्र धंगेकर यांनी भाजपकडे अप्रत्यक्षपणे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

भोंदू अशोख खरात प्रकरणी पोलिसांचा कारवाईचा धडाका सुरूच आहे. महिलांचा लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातची दिवाळी यंदा तुरुंगातच गेली. नाशिकमधील खरातचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर अनेक राजकीय नेत्याचे फोटो समोर आले होते. खरातच्या संस्थेशी रुपाली चाकणकरांचं कनेक्शन देखील समोर आलं होतं. त्यानंतर रुपाली चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. त्याचवेळी भोंदू खरातचे पाय धरतानाचे चंद्रकांत पाटील यांचेही फोटो समोर आले होते. परंतु चंद्रकांत पाटील यांच्यावर पक्षाकडून कोणतीही कारवाई झाली नव्हती. याच मुद्द्यावरून शिंदे गटाचे रवींद्र धंगेकर यांनी सवाल करत घेरलं आहे.
भोंदू अशोक खरातची छत्री धरल्याने सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यानंतर त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात आलं होतं. परंतु या प्रकरणात भाजपने चंद्रकांत पाटील यांच्यावर कारवाई करावी, यासाठी धंगेकरांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी थेट सोशल मीडियावर पोस्ट करत देवेंद्र फडणवीसांना सवाल केला आहे. त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली. त्यामुळे धंगेकरांच्या मागणीवर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, भोंदू अशोक खरातची यंदाची दिवाळी तुरुंगातच गेली. चमत्काराचे दावे करून सामान्यांची फसवणूक करणाऱ्या खरातचा तुरुंगातील पहिला सण होता. 11 गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या खरातच्या आलिशान तृप्तबाला बंगल्यात शुकशुकाट होता. भक्तांच्या गर्दीने फुलणारा बंगला यंदा ओस पडला होता.
रवींद्र धंगेकर यांनी नेमकं काय म्हटलं?
रवींद्र धंगेकर म्हणाले, ‘खरात प्रकरणात खरातसाठी छत्री धरल्यामुळे रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात आले. मग खरातचे पाय धरणारे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याबाबतीत वेगळा न्याय का? देवेंद्रजी, न्यायाची भूमिका घेताना व्यक्ती पाहून निर्णय होऊ नये. रूपाली चाकणकर यांच्याबाबतीत जो निकष लावला, तोच चंद्रकांतदादा पाटील यांच्याबाबतीतही लावला पाहिजे. चंद्रकांतदादांसाठी खरात बाबाने वेगळा टेबल मांडला होता का?’.