Rohit Pawar : शरद पवारांना दुष्काळाची दाहकता समजते, शेतकऱ्यांचं राज्यात किती नुकसान झालं? रोहित पवारांनी दिली आकडेवारी
राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाची झळ पोहोचायला लागली आहे. परंतु सरकारने नुकसानाची मोजणी व्यवस्थित केली नसल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

महाराष्ट्रातील बळीराजावर कोरड्या दुष्काळाचं मोठं संकट आहे. ऐन सणासुदीच्या काळातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल झालं आहे. लागवडीसाठी लागलेला खर्च आणि हाती आलेलं पीक हातातून निसटल्याने शेतकरी खचला आला आहे. सरकारने देखील कोरडा दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे सरकारी मदत कधी मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. परंतु सरकारने शेतकऱ्यांची नुकसान भरपाई व्यवस्थित मोजली नसल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. आमदार रोहित पवार यांनी नुकसानाची आकडेवारीच मांडली आहे.
राज्यात तब्बल 60 टक्के पावसाची कमतरता
रोहित पवारांनी (Rohit Pawar) मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. रोहित पवार म्हणाले, ‘शरद पवार यांना दुष्काळाची दाहकता समजून येते, त्यामुळे त्यांनी काय उपाययोजना केली पाहिजे, यासंदर्भात पत्र लिहलं आहे. राज्यात सध्या सरासरी पेक्षा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे पेरणीच संकट ओढवलेलं आहे. माझ्या कर्जत जामखेड मतदारसंघात फक्त ४० टक्के पाऊस पडला आहे. ६० टक्के पावसाची कामतरता आहे. सोयाबीन,तूर,मका,कापूस,भात आणि इतर पिकाच्या संदर्भात शेतकऱ्यांचा झालेला खर्च हा उत्पन्नातून निघालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची कंबर मोडली गेली आहे.
विदर्भात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान – रोहित पवार
‘35984 कोटी रुपयांचं शेतकऱ्यांच नुकसान झाल आहे. शेतकऱ्यांच्या हातात काही आलं नाही. संपूर्ण विदर्भात 22456 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. भाजपचे बहुतांश नेते विदर्भातून येतात आणि त्यांच्याच भागात इतकं नुकसान झाला आहे. कापूस,सोयाबीन आणि मका हे तीन पिक पकडून हे इतकं मोठं नुकसान झालं आहे आणि त्यात अजून फळबाग पकडली गेली नाही आहे. हे फक्त खरीपचा नुकसान झालं आहे. त्यात रब्बी पिकाचं किती नुकसान झालं आहे हे मोजलं गेल नाही, असा आरोप रोहित पवार यांनी केला. रोहित पवार यांनी इतरही आकडेवारी देत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सरकारवर टीका केल्यानंतर आता सत्ताधारी रोहित पवारांना काय प्रत्युत्तर देतात, हे पाहावे लागेल.