“शिंदे साहेब” नेमके कोण? आणि त्यांनी गौरव आहुजाला का वाचवलं?” पुण्यात नंगानाच करणाऱ्या तरुणाच्या माफीनाम्यावर RTI कार्यकर्त्याचा सवाल
पुण्यात गौरव आहुजाने सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याने माफी मागितली, पण त्याने "शिंदे साहेब" यांचीही माफी मागितल्याने वाद निर्माण झाला आहे. RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या प्रकरणात राजकीय हस्तक्षेपाचा आरोप केला आहे. या घटनेनंतर पुण्यात मोठी चर्चा रंगली आहे.

पुण्यात काल ऐन सकाळी तरुणाने रस्त्यावर लघुशंका करत अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर पुणेकर हादरले आहेत. गौरव आहुजा असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. पुण्यात नंगानाच करणाऱ्या या तरुणाला आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यानंतर गौरव अहुजाने माफी मागितली. मी चुकलो, मला एक संधी द्या, असं गौरव आहुजाने व्हिडीओत म्हटले. संपूर्ण जनता, पोलीस प्रशासन आणि शिंदे साहेबांची माफी मागतो, असा उल्लेख गौरवने माफी मागताना केला आहे. यामुळे आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. “शिंदे साहेब” पुण्याच्या मद्यधुंद बड्या बापाच्या मुलाला वाचवण्यासाठी सूत्र हलवत आहेत का? असा सवाल RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे.
RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी पुण्यातील गौरव आहुजाच्या माफीनाम्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. पुण्यात नंगानाच करणाऱ्या गौरव आहुजाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याचा माफी मागतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात त्याने मला एक संधी द्या, असे म्हटले आहे. “मी गौरव आहुजा, राहणार पुणे, काल माझ्याकडून जे कृत्य झालं होतं, ते खूप चुकीचं होतं. मी मनापासून माफी मागतो. संपूर्ण जनता, पोलीस प्रशासन आणि शिंदे साहेबांची माफी मागतो. मला माफ करा आणि मला एक संधी द्या. सॉरी”, असे गौरव आहुजाने म्हटले. यात गौरवने शिंदे साहेब असा उल्लेख केला आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
विजय कुंभार यांचे ट्वीट
शिंदे साहेब” पुण्याच्या मद्यधुंद बड्या बापाच्या मुलाला वाचवण्यासाठी सूत्र हलवत आहेत का? कालपर्यंत रस्त्यात थांबवलेल्या BMW गाडीतून उतरत सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणारा, स्थानिकांशी गैरवर्तन करणारा, दारूच्या नशेत असभ्य वर्तन करणारा “गौरव आहुजा” आज अचानक माफी मागत फिरतोय! पण प्रश्न हा आहे की “तो माफीस पात्र आहे का?”
आश्चर्याची गोष्ट अशी आहे की, गौरव आहुजा केवळ जनतेची आणि पोलिसांची माफी मागत नाही तर तो विशेषतः “शिंदे साहेबांची” माफी मागतोय! म्हणजे प्रश्न हा आहे की हे “शिंदे साहेब” नक्की कोण? आणि त्यांचा या संपूर्ण प्रकरणाशी नेमका काय संबंध आहे?
आहुजाने आपल्या माफीनाम्यात शिंदे साहेबांचे पहिले नाव टाळले आहे! जर केवळ दारू पिऊन रस्त्यात गैरवर्तन करणाऱ्या एका गुन्हेगाराला कोणत्या तरी “शिंदे साहेबांची” माफी मागण्याची गरज भासते तर त्याचा अर्थ हा स्पष्ट आहे की, या प्रकरणात एखाद्या मोठ्या व्यक्तीचा हस्तक्षेप आहे!
शिंदे साहेबांनी आहुजाला वाचवण्यासाठी कोणतीतरी महत्त्वाची भूमिका बजावली? मी आधीच भाकीत केलं होतं — गौरव आहुजा पोलिसांना तोपर्यंत शरण जाणार नाही जोपर्यंत त्याच्या शरीरातील अल्कोहोलचे प्रमाण पूर्णतः नाहीसे होत नाही! आणि नेमकं तसंच झालं! हा एक स्पष्ट कायदेशीर डाव होता आणि गौरव आहुजाने तो अत्यंत व्यवस्थित रचला आणि पारही पडला.
🔥 “शिंदे साहेब” पुण्याच्या मद्यधुंद बड्या बापाच्या मुलाला वाचवण्यासाठी सूत्र हलवत आहेत का?
कालपर्यंत रस्त्यात थांबवलेल्या BMW गाडीतून उतरत सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणारा, स्थानिकांशी गैरवर्तन करणारा, दारूच्या नशेत असभ्य वर्तन करणारा “गौरव आहुजा” आज अचानक माफी मागत फिरतोय! पण… pic.twitter.com/liIHk7KGZx
— Vijay Kumbhar (@VijayKumbhar62) March 9, 2025
आठवा तो व्हायरल व्हिडिओ, भररस्त्यात BMW गाडी उभी करून, मद्यधुंद अवस्थेत गौरव आहुजा गाडीतून उतरतो, सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करतो, स्थानिकांनी विरोध केला असता अश्लील इशारे करतो आणि नंतर भरधाव गाडीने पळ काढतो. त्याच्या सोबत त्याचा मित्र भाग्यश ओसवाल देखील होता, जो कारमध्ये दारूची बाटली घेऊन बसला होता. यानंतर FIR नोंदवला गेला पण आश्चर्य म्हणजे गौरव आहुजा अचानक गायब झाला.
गौरव आहुजाची माफी आणि त्याने उल्लेख केलेला “शिंदे साहेब” याचा नेमका संबंध काय? गौरव आहुजाला नेमकी कोणत्या शिंदे साहेबांची माफी मागण्याची गरज भासली? आता **सर्वात मोठा प्रश्न: हे “शिंदे साहेब” नेमका कोण आहेत? का गौरव आहुजाने माफीनाम्यात “शिंदे साहेबांचे” नाव घेतले? “शिंदे साहेब” आणि गौरव आहुजामधील नक्की काय संबंध आहे ते बाहेर आलं पाहिजे! आम्हाला उत्तरं हवी आहेत! “शिंदे साहेब” नेमके कोण? आणि त्यांनी गौरव आहुजाला का वाचवलं?” असे अनेक सवाल RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केले आहेत.
