भोंदू बाबा खरातप्रकरणी रुपाली चाकणकरांना नारळ देणार? प्रफुल्ल पटेलांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांचे नाव आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करत कारवाईचे संकेत दिले आहेत.

भोंदू बाबा खरातप्रकरणी रुपाली चाकणकरांना नारळ देणार? प्रफुल्ल पटेलांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ
rupali chakankar
| Updated on: Mar 20, 2026 | 12:34 PM

अंधश्रद्धा, भोंदूगिरी आणि बलात्कार अशा गंभीर आरोपांमुळे चर्चेत आलेल्या स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात प्रकरणी आता नवनवीन घडामोडी घडत आहेत. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांचे नाव आले आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्यातच आता या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्वानेही रूपाली चाकणकर यांच्यावर नाराजी वर्तवली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी नाशिकमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली. अशोक खरात याने केलेले भोंदूगिरीचे प्रकार अत्यंत वाईट आणि घाणेरडे आहेत. अशा प्रवृत्तीवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. ज्या राजकीय नेत्यांची नावे या प्रकरणात जोडली जात आहेत, त्यांच्यावर पक्ष म्हणून आम्ही योग्य ती कारवाई करू. येणाऱ्या काळात आमची भूमिका सर्वांना स्पष्टपणे दिसेल, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा

नाशिक पोलिसांनी अशोक खरातला अटक केल्यानंतर त्याचे रूपाली चाकणकर यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहेत. या फोटोंचा आधार घेत विरोधकांनी सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या घटनात्मक पदावर असताना अशा प्रवृत्तीच्या व्यक्तीशी संबंध असणे हे दुर्दैवी आहे, अशी टीका होत आहे. आता याप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

एसआयटी चौकशी सुरू

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून शासनाने याची एसआयटी चौकशी सुरू केली आहे. सध्या पोलीस प्रशासन अशोक खरात याच्या आर्थिक व्यवहारांची आणि बेकायदेशीरपणे जमवलेल्या संपत्तीची कसून चौकशी करत आहे. खरातच्या संपर्कात कोणकोणते राजकीय नेते होते आणि त्यांना या प्रकरणाची पूर्वकल्पना होती का, या दिशेनेही तपास सुरू आहे.

दरम्यान प्रफुल्ल पटेलांच्या या विधानामुळे रुपाली चाकणकरांवर पक्षांतर्गत कारवाईचे संकेत मिळत आहेत. रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाचे अध्यक्षपद सोडावे लागते की पक्ष त्यांची पाठराखण करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Follow Us