
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे. फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील त्यांच्या एका वक्तव्यामुळे पक्ष आणि महिला आयोग बदनाम झाल्याचा आरोप होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या एका गटासह, ठाकरे गट आणि रुपाली पाटील ठोंबरे यांनी पुण्यात तीव्र आंदोलन केले आहे.
पुण्यातील गुडलक चौक आणि रुपाली चाकणकर यांच्या धायरी येथील कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. ज्या अध्यक्षा चुकलेल्या आहेत, चुकीला माफी नाही त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. महिला आयोग अध्यक्ष का महिलांचा अवमान आयोग?, महिला आयोगाचे काम मेकअप साठी थांब, मे मेकअप करके खडी तो सबसे बडी, महिला आयोग की पुरुष आयोग अशा आशयाचे फ्लेक्स तयार करून यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी आंदोलकांनी रुपाली चाकणकर यांच्या फोटोला जोडे मारले. तसेच काही ठिकाणी त्यांचे फ्लेक्स जाळून आपला संताप व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले, तर शिवसेना ठाकरे गटाच्या रेखा कोंडे यांच्या नेतृत्वाखालील महिला आघाडीने धायरी येथील कार्यालयाबाहेर निदर्शने केली.
दरम्यान फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी मृत महिलेच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे, तसेच पीडितेलाच दोषी ठरवणारे वक्तव्य केल्याचा आरोप आहे. यामुळे महिला आयोगाचे पावित्र्य भंग झाले आणि महिलांचा अपमान झाला, अशी आंदोलकांची भूमिका आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही रुपाली चाकणकर यांच्या वक्तव्याशी सहमत नसून, महिला आयोगाच्या अध्यक्षांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन नंतर इतरांची भेट घ्यायला हवी होती, असे स्पष्ट मत व्यक्त केले. आयोगाचे मत म्हणजे पक्षाचे मत नाही, असेही त्यांनी सांगितले.
आता त्यावर रुपाली चाकणकर यांनी सध्याच्या आरोपांवर थेट प्रतिक्रिया देणे टाळले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत या संपूर्ण प्रकरणावर सविस्तर भूमिका मांडणार असल्याचे म्हटले आहे. राज्य महिला आयोग हे एक स्वतंत्र व्यासपीठ असल्याचेही आंदोलकांनी स्पष्ट केले आहे. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी दिवसेंदिवस तीव्र होत असल्याने, या वादाचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.