सचिन अहिर यांची आमदारकी धोक्यात? ठाकरे गटाकडून मोठा निर्णय; थेट विधान परिषद…
Sachin Ahir : आज शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता त्यांच्यावर कारवाई करण्याची तयारी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

राज्याच्या राजकारणात आज पुन्हा मोठी घडामोड पहायला मिळाली. गेल्या आठवड्यात 6 खासदार फुटल्यानंतर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. सचिन अहिर हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय होते, त्यामुळे पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे. अशातच आता ठाकरे गटाकडून सचिन अहिर यांच्यावर कारवाईसाठी पावले उचलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
कारवाईसाठी पत्र देणार
सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर आता ठाकरे गटाकडून कारवाईसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता ठाकरे गटाकडून विधान परिषद अध्यक्षांना कारवाईसाठी पत्र देण्यात येणार आहे. सचिन अहिर यांच्यावर कारवाई करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने कायदेशीर सल्ला घेतला असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे आता आगामी काळात सचिन अहिर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सचिन अहिर यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या कामाचे कौतुक करताना अहिर म्हणाले की, ‘मी एकनाथ शिंदे यांचा आभार मानतो. कोळश्यातून हिऱ्याची चमक दिसते आणि तो हिरा जवळ करण्याची संधी येते त्यातून विश्व घडतं. शिंदेंनी मला उपसभापती या पदावर मान दिला. तळागाळातील कार्यकर्ता या पदावर जाऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. त्यांनी कॉमन मॅन म्हणून मुख्यमंत्री असताना काम केलं. सरकारमध्ये राहून काम केलं पाहिजे. पण विधिमंडळातूनही काम करण्याचं काम मी त्यांच्या नेतृत्वात करणार आहे.
शिवसेना ठाकरे गटावरही भाष्य
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नेत्यांना भेटत असल्याचा आरोप अनेकदा केला जातो. याबाबत प्रश्न विचारला असता सचिन अहिर यांनी, ‘माझा काही अनुभव नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन शिंदे काम करत आहेत. ते आकर्षण आहे. खासगीत अनेक लोकप्रतिनिधींना विचारा ते सांगतील. असा नेता आम्हाला साथ देणार असेल तर काम करायला येते. थोडा संयम ठेवायचा आहे. काही लोकांनी आयुष्यात कधी दगड उचलला नाही ते आम्हाला शिकवायला लागले तर कसं व्हायचं असं विधान केले आहे.