
Sambhaji Bhide : शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे हे वेगवेगळ्या कारणांमुळे कायम चर्चेत असतात. त्यांनी केलेली काही विधाने तर चांगलीच वादग्रस्त ठरली. मुल होण्यासाठी माझ्याजवळचा आंबा खावा, या विधानामुळे भिडे यांच्यावर सडकून टीका करण्यात आली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा भिडे यांचे एक विधान चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांनी नवरात्रोत्सव आणि दांडीया खेळण्यावर भाष्य केले आहे. गणेशोत्सव आणि नवरात्रीचे वाटोळे करून टाकले आहे. तसेच त्यांनी भारतीय संविधानावरही वादग्रस्त विधान केले आहे.
सांगलीत नवरात्रीच्या औचित्याने दरवर्षी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात येते. या दौडीमध्ये बोलताना संभाजी भिडे म्हणाले, दैवतांचा पूजा करणारा हिंदू समाज जगाच्या पाठीवर क्रमांक एकचा गुलाम आहे. लाचार पारतंत्र्यात राहण्यात ज्यांना लाज वाटली नाही अशा निर्लज्ज लोकांचा हा देश आहे. जगात एकूण 187 देश आहेत. यात आपली लायकी काय? तर संविधान. पोटात मुरडा झाल्यासारखं विद्वान लोक असे. बोलतात. अरे काय संविधान. पारतंत्र्यात खितपत पडलेल्या निर्लज्ज लोकांचा देश आहे, असे वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी केले. दरम्यान, आम्हाला केवळ स्वातंत्र्य नको तर हिंदवी स्वातंत्र्य पाहिजे असेही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याने पुन्हा वादाला तोंड फुटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आदर्श आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपण नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने दुर्गामाता दौडीचे आयोजन करतो. ज्या दिवशी शिवाजी महाराजांनी शपथ घेतली तो दिवस विस्कटलेल्या नवरात्राला दुरुस्त करण्याचा प्रारंभ होता. गणपती उत्सव, नवरात्रमध्ये दांडिया खेळून सगळे वाटोळे केले. दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा आहे. नपुंसकपणा आहे. 1300 वर्षांपासून मुसलमान आणि युरोपियन लोकांच्या पारतंत्र्यात खितपत पडलेला जीव असावा अशा लोकांचा हा देश आहे. पारतंत्र्याची, गुलामीची ज्यांना लाज वाटत नाही अशा निर्लज्ज लोकांचा देश आहे, असे विधान संभाजी भिडे यांनी केले. तसेच आम्हाला नुसते स्वराज्य नकोय. आम्हाला स्वातंत्र्य नकोय. आम्हाला हिंदवी स्वातंत्र्य पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
दरम्यान भिडे यांनी गरबाला नपुंसकपणाशी जोडल्याच्या विधानावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकीकडे विहिंप, बजरंग दल, गरबा-दांडियात मुस्लिमांचा समावेश आहे का हे तपासण्यासाठी आधार कार्ड मागत आहे. तर दुसरीकडे भिडे गरबाला हिणवत आहेत. अन्य कुणी असे विधान केले असते तर पिसे काढली गेली असती, दिव्य भिडेबद्दल आम्ही पामरांनी काय बोलावे, असा मिश्किल टोला वडेट्टीवार यांनी लगावला.