विधानसभा अध्यक्ष म्हणाले, क्रांतिकारी निर्णय देणार; संजय राऊत म्हणतात, तर आम्ही…

| Updated on: Jun 08, 2023 | 10:25 AM

आमदार अपात्रतेचा निर्णय मी मेरिटवरच देणार आहे. तो निर्णय क्रांतिकारक असेल, असं विधान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलं आहे. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.

विधानसभा अध्यक्ष म्हणाले, क्रांतिकारी निर्णय देणार; संजय राऊत म्हणतात, तर आम्ही...
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबाद : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एका कार्यक्रमात बोलताना आमदारांच्या अपात्रतेसंबंधी आपण क्रांतिकारक निर्णय देणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच लवकरच या प्रकरणाचा निकाल लागणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली आहे. आम्ही विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीचा मान ठेवतो. ज्या महाराष्ट्राने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे घटनाकार निर्माण केले. त्याच महाराष्ट्रात घटनेचा खून होणार नाही असं मला वाटतं, असं सांगतानाच विधानसभा अध्यक्षांनी जर या प्रकरणी 90 दिवसात निर्णय दिला नाही तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊ, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत हे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. आमचा विधानसभा अध्यक्षांवर विश्वास आहे. आमचं व्यक्तीशी भांडण असू शकतं. कारण व्यक्ती जी आहे, ती अनेक पक्ष बदलून खुर्चीवर बसली आहे. पण शेवटी ती घटनात्मक खुर्ची आहे. घटनात्मक पद आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि अध्यक्ष म्हणूनच त्यांना निर्णय घ्यावे लागणार आहे. मेरिट काय आहे हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. कोर्टाच्या निर्णयाबाहेर कुणालाही जाता येणार नाही. त्यांच्या मनात काही घटनाबाह्य असेल आणि त्यानुसार काय घडलं तर महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे येणारा काळ ठरवेल, असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलं आहे.

हे सुद्धा वाचा

निवडणूक आयोग विकला गेला

माझा अध्यक्षांवर विश्वास आहे. त्या खुर्चीवर विश्वास आहे. महाराष्ट्राने डॉ. आंबेडकारांसारखे घटनाकार निर्माण केले. त्या महाराष्ट्रात घटनेची हत्या होईल हे मी मानायला तयार नाही. निवडणूक आयोगावर विश्वास नाही. तो विकला गेलेला आयोग आहे. मागच्या एका प्रकरणात तुम्ही पाहिलं असेल. फुटीर गटाच्या हातात शिवसेना देण्यात आली. हा केवळ खरेदी विक्रीचा निर्णय असू शकतो हे मी ऑन रेकॉर्डही सांगतो. कोर्टानेही आपलं निरीक्षण नोंदवलं आहे. निवडणूक आयोगाने राजकीय दबावाने निर्णय दिला. ही घटनात्मक संस्था विकली गेली आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

सर्वोच्च न्यायालयात जाऊ

विधानसभा अध्यक्ष रिझनेबल टाईममध्येच निर्णय देणार आहेत, याकडे राऊत यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. रिझनेबल टाईम हा 90 दिवसांचा असतो. त्यांना 90 दिवसात निर्णय द्यावा लागेल. तुम्ही तुमच्या वेळेनुसार वेळ काढू शकणार नाही. 90 दिवसात निर्णय नाही दिला तर आम्ही त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात पुन्हा जाऊ, असं त्यांनी स्पष्ट केलं.

23 जून रोजी बैठक

देशभरातील विरोधी पक्षांची बिहारच्या पाटणा येथे बैठक होणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या बैठकीचं आयोजन केलं आहे. येत्या 23 जूनला देशातील सर्व प्रमुख पक्षांची बैठक आम्ही पाटणा येथे बोलावली आहे. मी विरोधी पक्ष म्हणत नाही. देशातील प्रमुख राजकीय पक्ष म्हणत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 23 जूनला पुढल्या राजकीय लढाईचं सूत्र ठरवलं जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.