Sanjay Raut : उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांचा दबाव, शिंदेंच्या घराबाहेरील गाडीमध्ये… संजय राऊत यांच्या आरोपांनी खळबळ

संजय राऊत यांनी निवडणूक प्रक्रियेत गंभीर गैरप्रकारांचे आरोप केले. आरओंकडून उमेदवारांवर अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणला जात आहे, तर विधानसभा अध्यक्षांनीही विरोधी उमेदवारांना धमक्या दिल्याचा दावा केला. सीसीटीव्ही फुटेज गायब होणे आणि बिनविरोध निवडून येण्यासाठी धमक्या, पैशांचा वापर यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणूक आयोगाने या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी राऊत यांनी केली.

Sanjay Raut : उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांचा दबाव, शिंदेंच्या घराबाहेरील गाडीमध्ये... संजय राऊत यांच्या आरोपांनी खळबळ
संजय राऊत संतापले
| Updated on: Jan 02, 2026 | 10:39 AM

आगामी महापालिका निवडणुकांसाठी विविध पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मात्र उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावा, माघार घ्यावी म्हणून निवडणूक अधिकारी विरोधी पक्षाच्या उमेदवारांना धमक्या देत आहेत, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.  त्यांच्यावर प्रत्येक ठिकाणी संबंधित पालकमंत्र्यांचा दबाव आहे, हे किती काळ चालणार ? ही लोकशाही आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  काल उपमुख्यमंत्री (शिंदे) यांच्या निवासस्थानाच्या बाहेर सरकारी अधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा उभा होता, त्यामध्ये काही आर.ओ. होते. आचारसंहिता लागू आहे ना, मग अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचे पालन स्वत: केलं नाही तर ते उमेदवारांना आणि जनतेला कोणत्या आधारावर सांगतात की आचारसंहितेचं पालन करा ? असा थेट सवाल राऊत यांनी विचारला.

निवडणूक आयोगाने या सर्व आर.ओंच्या फोनचे रेकॉर्ड तपासले पाहिजेत. त्यांना कोणत्या मंत्र्याचे, उपमुख्यमंत्र्यांचे कधी फोन आले आणि त्यानुसार कोणते उमेदवारी अर्ज हे बाद केले हे तपासलं पाहिजे अशी मागणी राऊत यांनी केली.

गगराणीही कारस्थानात सामील आहेत का ?

विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षाच्या उमेदवारांना धमक्या दिल्या आहेत. राहुल नार्वेकर यांचा विषय हा अत्यंत गंभीर आहे. ते काय मला उत्तर देणार, त्यांचा प्रवास शिवसेनेतूनच सुरू झाला आहे.  30 डिसेंबरचं दुपारी 4 नंतरचं सीसीटीव्ही फुटेज काढा. माझ्या माहितीप्रमाणे ते फुटेज गायब आहे. विधानसभा अध्यक्षांचं सीसीटीव्ही फुटेज गायब कसं होतं ? असा सवाल राऊत यांनी उपस्थित करत खळबळजनक आरोप केले आहेत. भूषण गगराणी हे पालिकेचे आयुक्त आहेत, तेही या कट-कारस्थानात सामील झाले आहेत का ? असा खडा सवालही राऊत यांनी विचारला. सीसीटीव्ही फुटेज गायब होतयं, ही कसली यांची यंत्रणा, महापालिका आयुक्तांनी याचं उत्तर दिलं पाहिजे. त्या विभागाचे आर.ओ. आहेत त्यांची चौकशी व्हायला हवी या मागणीचा राऊतांनी पुनरुच्चार केला.

कल्याण-डोंबिवली यांच्या बापाचं आहे का ?

माघार घेत नाहीत म्हणून जळगावला उमेदवारांचं अपहरण केलं आणि बिनविरोध निवडून येण्यासाठी जबरदस्तीने माघार घ्यायला लावली. बिनविरोध निवडून येण्यासाठी जी स्पर्धा सुरू आहे सध्या निवडणुकीत, ती फक्त धमक्या, पैशांचा वापर, ब्लॅकमेलिंग , दहशत पसरवणं सुरू आहे. मग या राज्याचे मुख्यमंत्री आणि निवडणूक आयुक्त काय करत आहेत ? कल्याण डोंबिवली मध्ये बिनविरोध निवडमू आल्यावर विजयाच्या मोठ्या मिरवणुका काढल्या जात आहेत, कल्याण-डोंबिवली यांच्या बापाचं आहे का ? असा संतप्त सवाल राऊत यांनी विचारला.