‘ठाणे महापौर चषका’वर सांगली-कोल्हापूरच्या मल्लांचं नाव

ठाण्याच्या आर्य क्रीडा मंडळ येथे मागील 3 दिवस खुल्या गटातील मातब्बर मल्लांच्या चटकदार लढती झाल्या (Thane Mahapaur Chashak 2020).

  • गणेश थोरात, टीव्ही 9 मराठी, ठाणे
  • Published On - 9:15 AM, 20 Jan 2020
'ठाणे महापौर चषका'वर सांगली-कोल्हापूरच्या मल्लांचं नाव

ठाणे : ठाण्याच्या आर्य क्रीडा मंडळ येथे मागील 3 दिवस खुल्या गटातील मातब्बर मल्लांच्या चटकदार लढती झाल्या (Thane Mahapaur Chashak 2020). यात खुल्या गटातून पैलवान मारुती जाधव, तर महिला गटातून सृष्टी भोसले राज्यस्तरीय ठाणे महापौर चषकाचे या वर्षीचे मानकरी ठरले. या स्पर्धेत खुल्या गटातील विजेत्या मल्लास 1,25,000/- रुपये, ठाणे महापौर केसरी किताब, चांदीची गदा आणि सन्मान पट्टा प्रदान करण्यात आला (Thane Mahapaur Chashak 2020).

ठाणे महापौर चषकासाठी पैलवान मारुती जाधव (सांगली) आणि पैलवान सिकंदर शेख (कोल्हापूर) यांच्यात अंतिम लढत झाली. दोन्ही मल्लांनी सलग 2 दिवस प्रेक्षणीय कुस्ती करून अंतिम लढतीत धडक मारली. त्यामुळे एका प्रेक्षणीय कुस्तीची अपेक्षा ठेवून सर्व कुस्ती शौकिनांच्या नजरा मारुती आणि सिकंदरच्या लढतीकडे होत्या. कुस्तीच्या सुरुवातीला सिकंदरने आक्रमक पवित्रा घेत 2 गुणांची कमाई केली. मात्र, त्यानंतर लगेचच लढत सुरू असताना सिकंदरच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने पंचांनी पैलवान मारुती जाधव यांना विजयी घोषित केले.

महिला खुला गटातील अंतिम लढत कोल्हापूरची सृष्टी भोसले आणि पुण्याच्या मनीषा दिवेकर यांच्यात झाली. अतिशय काट्याच्या या लढतीत पहिल्या हाफमध्ये दोन्ही मल्लांनी 4 गुण वसूल केले. मध्यांतरानंतर पुन्हा कुस्तीला सुरुवात झाली, पण मनिषाने नकारात्मक कुस्ती केल्याने शेवच्या 5 सेकंदात सृष्टीला गुण मिळाले. त्यामुळे ही तुल्यबळ लढत 5-4 अशा गुणांनी जिंकत पैलवान सृष्टी भोसले पहिल्या ‘महिला महापौर चषक’ ठरल्या. या राज्यस्तरीय स्पर्धेत खुल्या गटातील विजेत्या मल्लास 1,25,000/- रुपये, ठाणे महापौर केसरी किताब, चांदीची गदा आणि सन्मान पट्टा प्रदान करण्यात आला. तर उपविजेत्या मल्लास 75,000/- रुपये, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकास अनुक्रमे 60,000/- रुपये आणि 40,000/- हजारांचे रोख पारितोषिक, सन्मान चषक प्रदान करण्यात आला.

राज्यस्तरीय महिला गटासाठी प्रथम क्रमांकाला 75,000/- रुपये आणि सन्मान पट्टा देण्यात आला. द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी अनुक्रमे 40,000/-, 20,000/- आणि 10,000/- हजारांचे रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. ठाणे जिल्हा पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी पालिका आयुक्त संजीव जैस्वाल, महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्ल्लवी कदम आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

मराठामोळ्या कुस्तीच्या खेळाला जिवंत ठेवण्यासाठी ठाण्यात खेळाडूंना तालीम आणि मैदान दिले जाणार आहे. कुस्तीगिरांसाठी ठाण्यातदेखील मॅट आणि मैदानी खेळासाठी चालना दिली जाईल. लवकरात लवकर त्यासाठी जागा दिली जाणार असल्याचं आश्वासन पालिका आयुक्त संजीव जैस्वाल यांनी दिलं.
याप्रसंगी एकनाथ शिंदे म्हणाले, “मुंबईत 24 तास काम करणारे कामगार आणि लोक आहेत. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी अनिवासी भागात अशा ठिकाणी मुंबई ’24 बाय 7′ ही संकल्पना सर्वांना आवडेल. या संकल्पनेचं मी स्वागत करतो. विजय वडेटीवर हे मंत्री मंडळातील सहकारी आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा अधिकार सर्वांना आहे, असंही शिंदे यांनी नमूद केलं.