दुहेरी हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला! किरकोळ वादातून शेजाऱ्याने नवरा-बायकोला संपवलं, सांगलीत खळबळ

Sangli Double Murder : सांगलीच्या कुपवाडमध्ये कचरा फेकण्याच्या वादातून शेजाऱ्याने नवरा बायकोवर जीवघेणा हल्ला केला होता. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

दुहेरी हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला! किरकोळ वादातून शेजाऱ्याने नवरा-बायकोला संपवलं, सांगलीत खळबळ
Sangli Double Murder
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Aug 18, 2026 | 5:56 PM

सांगलीतून थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. कुपवाडमध्ये कचरा फेकण्याच्या वादातून शेजाऱ्याने नवरा बायकोवर जीवघेणा हल्ला केला होता. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला आहे, त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 15 ऑगस्ट रोजी शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने पती-पत्नीवर चाकू आणि हातोडीने हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर मनीषा केसरीकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. आता त्यांचे पती मोहन केसरीकर यांचाही मृत्यू झाला आहे. याप्रकरणी केसरकर यांचा शेजारी फरीद शेख याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांकडून तपासाला सुरुवात

मोहन आणि मनीषा केसरेकर दाम्पत्य हत्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले होते. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, गुन्ह्यातील सर्व आवश्यक पुरावे गोळा करून लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे. आरोपीला कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळावी, यासाठी पोलीस प्रशासनाकडून तपासाला प्राधान्य दिले जात असल्याचे माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली आहे.

आरोपीचे घर जमीनदोस्त

या घटनेनंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी कुटुंबाची भेट घेत आरोपीचा एन्काउंटर करण्याची मागणी केली होती. या दुहेरी हत्याकांडानंतर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. आरोपी फरीद शेख याचे अतिक्रमित घर प्रशासनाकडून जमीनदोस्त करण्यात आले आहे. एखाद्या आरोपीचे घर पाडल्याची ही सांगली जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.

नेमकं काय घडलं होतं?

समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी फरीद शेख आणि केसरकर कुटुंबात किरकोळ कारणावरून वाद झाले होते. फरीद शेख हा पीडित कुटुंबाच्या घरावर रात्रीच्या वेळी दगड फेकायचा, टॉर्च मारायचा, तसेच दारात कचरा आणि खरकटे पाणी टाकायचा. त्याचबरोबर महिलेकडे बघून थुंकायचा. या कृत्यांमुळे केसरकर कुटुंब त्रासले होते. 15 ऑगस्टला शेख आणि केसरकर कुटुंबात अशाच कारणांवरून वाद झाला. या वादातून आरोपी फरीद शेखने केसरकर दाम्पत्यावर चाकू आणि हातोडीने हल्ला केला होता.

आरोपीवर कठोर कारवाईची मागणी

फरीद शेखच्या हल्ल्यात मनीषा केसरीकर आणि मोहन केसरकर हे गंभीर जखमी झाले होते. दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान सुरुवातीला मनीषा केसरकर यांचा आणि नंतर मोहन केसरकर यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट पसरली असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us