शिराळा तालुक्यातील 6 गावांवर भूस्खलनाची टांगती तलवार, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष! अनेक घरात पाण्याचा पाझर आल्यानं ग्रामस्थांचं स्थलांतर

| Updated on: Aug 05, 2021 | 3:01 PM

6 गावांवर तळीये आणि आंबेघरप्रमाणे डोंगराचा कडा कोसळण्याची टांगती तलवार आहे. जमिनीला आणि डोंगराला भेगा पडल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, अशास्थितीतही स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचं याकडे दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

शिराळा तालुक्यातील 6 गावांवर भूस्खलनाची टांगती तलवार, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष! अनेक घरात पाण्याचा पाझर आल्यानं ग्रामस्थांचं स्थलांतर
शिराळा तालुक्यात डोंगराला तडे, जमिन खचली
Follow us on

सांगली : जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग केल्यानं पुराचं संकट ओढावलं. त्यात शिराळा तालुक्यात पावसाचं थैमान पाहायला मिळालं. त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान पाहायला मिळालं. 6 गावांवर तळीये आणि आंबेघरप्रमाणे डोंगराचा कडा कोसळण्याची टांगती तलवार आहे. जमिनीला आणि डोंगराला भेगा पडल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, अशास्थितीतही स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचं याकडे दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तळीयेसारखी एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार आहे का? असा सवाल इथले स्थानिक विचारत आहे. (Fear of landslides in 6 villages of Shirala taluka of Sangli)

शिराळा तालुक्यात तब्बल 585 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कृष्णा आणि वारणेला आलेल्या महापुरामुळं नद्यांनी आपलं पात्र सोडलं आहे. परिसरातील जमिनी खचल्या आहेत. शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या मुसळधार पावसामुळं अनेक डोंगरांना याचा फटका बसला आहे. डोंगरावरील जमीन भुसभुशीत झाल्याने भेगा पडू लागल्या आहेत. डोंगराची पकड कमी होत आहे. त्यामुळं डफळेवाडीसारख्या गावात डोंगराच्या कडो कोसळल्याचं पाहायला मिळत आहे. तळीये आणि आंबेघरची दुर्घटना पाहता शिराळा तालुक्यातील नागरिक धास्तावले आहे. प्रशासन आमच्याकडे कधी लक्ष देणार याची वाट इथले शेतकरी आणि ग्रामस्थ पाहत आहेत. डोंगर काळ बनून कोसळण्यापूर्वी शासनानं जागं व्हावं अशी मागणी दरड कोसळत असलेल्या डफळेवाडीतील नागरिक करत आहेत.

घरात पाझर फुटले, भिंती कोसळण्याची भीती

शिराळा तालुक्यातीलच कोकनेवाडी ही वस्ती डोंगराच्या मध्यभागी आहे. डोंगर माथ्यावरुन पावसाचं पाणी या वस्तीत शिरत आहे. त्याचबरोबर सततच्या पावसामुळे वस्तीमधील घरात पाण्याचे पाझर फुटत आहेत. काही घराच्या भिंतींना ओल लागल्यामुळे त्या पडण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे इथल्या 200 लोकांचं स्थलांतर स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलंय. जनावरं मात्र वस्तीवच असल्यामुळे ग्रामस्थ रोज सकाळ संध्याकाळ वस्तीवर येऊन त्यांना पाणी वैरण करत आहेत. त्यामुळे दुपारी गाव ओस पडल्याचं चित्र इथं पाहायला मिळत आहे.

शिराळा तालुक्याकडे नेतेमंडळींचं दुर्लक्ष

शिराळा पश्चिम भागाला निसर्गाचं वरदान लाभलं आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मात्र यंदा पावसानं सगळ्या सीमा ओलांडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सांगली जिल्ह्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पूरस्थितीची पाहणी केली. मात्र, शिराळा तालुक्याकडे सर्वच मंत्र्यांनी पाठ फिरवल्याचं चित्र दिसून आलं. अशावेळी लोकांना अर्थसहाय्य करण्याची मागणी इथल्या नागरिकांकडून होत आहे.

संबंधित बातम्या :

ऑनलाईन परीक्षेत पास होऊन मुख्यमंत्र्यांचा पहिला नंबर, रावसाहेब दानवेंचा टोला

कोणी लाडका नाही, कोणी दुश्मन नाही, व्यापाऱ्यांनो, संयम सोडू नका; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

Fear of landslides in 6 villages of Shirala taluka of Sangli