मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची मजबुरी काय? संजय राऊतांचा सवाल, म्हणाले आज वाढदिवसानिमित्त….

महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांनी कोकाटे यांच्यावर तीव्र निषेध व्यक्त केला असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची मजबुरी काय? संजय राऊतांचा सवाल, म्हणाले आज वाढदिवसानिमित्त....
sanjay raut manikrao kokate
| Updated on: Jul 22, 2025 | 10:05 AM

महाराष्ट्राचे कृषिमंत्री तसेच नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी सर्कल खेळतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरुन ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी कृषिमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. तसेच ठाकरे गटाकडून त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे.

“माणिकराव कोकाटे यांना कृषिमंत्रिपदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. आज देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्र्‍यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना एक भेट दिली पाहिजे. ही भेट म्हणजे महाराष्ट्राच्या अशा कृषीमंत्र्यांचा राजीनामा घेणं. असंवेदनशील, अकार्यक्षम असा कृषीमंत्री सातत्याने महाराष्ट्राला लाभला आहे. माणिकराव कोकाटेंच्या आधी दादा भुसे कृषिमंत्री होते. त्यांचा शेतकऱ्यांना काही उपयोग झाला नाही”, असे संजय राऊत म्हणाले.

कोणत्याही परिस्थितीत कृषिमंत्र्यांचा राजीनामा द्यावा लागेल

“आता कोकाटे यांनी कहर केलेला आहे. शेती खातं म्हणजे ओसाडगावची पाटीलकी आहे. त्या पाटीलकीत मन रमत नाही म्हणून विधीमंडळात रमी खेळत बसतात. ऑनलाईन गेमिंग का इतके दिवस या मंत्र्‍यांना विधी मंडळात ठेवलंय मला कळत नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्‍यांची महाराष्ट्रात अशी काय मजबुरी आहे. संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला ओरडून सांगतोय, आक्रोश करतोय शेतकरी, लोक रस्त्यावर उतरलेत. राजीनामा मागण्यासाठी आपपसात हाणामाऱ्या सुरु आहेत आणि तरीही फडणवीस कृषीमंत्र्यांना सरंक्षण देतात. हा या राज्यातील शेतकरी वर्गाचा अपमान आहे. कोणत्याही परिस्थितीत कृषिमंत्र्यांचा राजीनामा द्यावाही लागेल आणि घ्यावाही लागेल”, असे ठाम मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

त्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार विरोधी पक्षाला नक्कीच आहे

विरोधी पक्षाला सातत्याने टार्गेट केलं जात आहे. आम्ही फक्त सत्य सांगण्याचा प्रयत्न करतोय. माणिकराव कोकाटे आमचे व्यक्तिगत शत्रू नाही. पण महाराष्ट्रात जे घडू नये ते घडतंय. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गांभीर्याने काम न करणारे या राज्याला कृषीमंत्री जर लाभले असतील तर त्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार विरोधी पक्षाला घटनेने दिलेला आहे. अजित पवारांना टार्गेट कशाला करता आहात, त्यांना जेव्हा टार्गेट केलं तेव्हा ते भाजपमध्ये सहभागी झाले. त्यांचा प्रश्न संपला. एकनाथ शिंदेना टार्गेट केलं, तेव्हा ते भाजपात सहभागी झाले. त्यांनी भाजपमध्ये सहभागी होण्याचा मार्ग स्वीकारला आहे. अशाप्रकारचे अनेक भ्रष्टाचारी, गुंड, अधिकारी भाजपत सहभागी होतात, असेही संजय राऊत म्हणाले.