
विधानभवनात पावसाळी अधिवेशन सुरु असताना माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा पाहायला मिळाला. यावेळी आव्हाड यांच्या कार्यकर्त्याचे शर्ट फाडण्यात आले, शिवीगाळ करण्यात आली. या घटनेनंतर महाराष्ट्राची प्रतिमा मलीन झाल्याचा घणाघात विरोध पक्षनेत्यांकडून केला जात आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काल विधानभवनात घडलेल्या घटनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला. हे टोळी युद्ध आणि गँगवॉर असून ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाज आणणारी घटना आहे, असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधीमंडळ परिसरात काल झालेल्या राड्याबद्दल प्रतिक्रिया दिली. यावेळी संजय राऊत यांनी “कालची घटना पाहिल्यावर शिवसेनेचे स्पष्ट मत झालं की महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटच लागायला हवी. यांना हे राज्य नियंत्रणात ठेवता येत नाही”, असा घणाघात संजय राऊतांनी केला.
“हे टोळी युद्ध आहे, गँगवॉर आहे. काल विधानभवनात जो प्रकार घडला हा फक्त दुर्दैवी नाही, दुख:द नाही, धक्कादायक नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाज आणणारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे एक विधान माझ्या लक्षात आहे की मी महाराष्ट्राची संस्कृती जपेन संस्कृती बदलू देणार नाही. पण महाराष्ट्राच्या संस्कृतीला त्यांच्या कारकिर्दीतच रोज अनेक मार्गाने डाग लागतोय. भ्रष्टाचार, व्याभिचार, हनी ट्रॅप, आमदार निवासातील टॉवेल गँग असेल, मंत्री पैशांच्या बॅगा घेऊन बसलेले असूनही कारवाई होत नाही. मोक्काचे आरोपी, खुनाचे आरोपी, दाऊदचे हस्तक हे त्यांच्या पक्षात विधीमंडळात घेतले जातात, ही या महाराष्ट्राची संस्कृती आहे का, असे मला देवेंद्र फडणवीसांना विचारायचे आहे. ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संस्कृती आहे का, ज्या संस्कारातून ते आले आहे, त्या संस्कारात जे सध्या राज्यात सुरु आहे ते सध्या बसतंय का आणि मुख्यमंत्री म्हणून ते खाली मान घालून बसलेले आहेत”, असे संजय राऊत म्हणाले.
“द्रोपदीचे वस्त्रहरण सुरु असताना धर्मराज ज्याप्रमाणे खाली मान घालून बसले होते, त्या भूमिकेत देवेंद्र फडणवीस आहेत. वस्त्रहरणाला पांडवांचे पाठबळ होते. पांडव कमजोर होते, त्यामुळे ते वस्त्रहरण ते उघड्या डोळ्यांनी पाहत होते. द्रोपदीला जुगारावर लावणाऱ्या जी ही संस्कृती या देशात निर्माण झाली होती, मला वाटतं भाजप आणि त्यांचे नेते उघड्या डोळ्याने महाराष्ट्राचे वस्त्रहरण पाहतात. त्याला ते सर्वस्वी जबाबदार आहेत, कारण ते जुगाराच्या अड्ड्यावर बसले आहेत”, अशी टीका संजय राऊतांनी केली.
“महाराष्ट्राच्या विधानभवनात काल गँगवॉर झाला. विधानभवनात काल टोळी युद्ध झालं. खुनातले, मोक्काचे आरोपी, दरोड्यातील आरोपी काल विधानभवनाच्या लॉबीत होते, त्यांना कोणी आणलं. काय कारवाई झाली, कालची घटना पाहिल्यावर शिवसेनेचे स्पष्ट मत झालं की महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटच लागायला हवी. यांना हे राज्य नियंत्रणात ठेवता येत नाही. हे गुंडांचे राज्य झालं आहे. जर हे इतर कोणाच्या राज्यात झालं असतं, कोणी अन्य मुख्यमंत्री असता, तर हेच देवेंद्र फडणवीस विधानभवनाच्या पायरीवर येऊन हे सरकार बरखास्त करा, इथे राष्ट्रपती राजवट लावा, असे किंचाळले असते. मग काल घडलेल्या घटनेनंतर त्यांना हे वाटत नाही का की माझं राज्य हे आता राष्ट्रपती राजवट लागण्याच्या लायकीचे झाले आहे”, असेही संजय राऊत म्हणाले.