Sanjay Raut : ‘मी नारायण राणेंना मानतो’ संजय राऊतांनी असं नेमकं का म्हटलं? किस्सा इंटरेस्टिंगय!

संजय राऊत यांनी सामनातील अग्रलेखातूनही शिवसेनेतून जे बाहेर गेले, त्यांची राजकीय कारकीर्द संपल्याचं ठसवून सांगितलंय.

Sanjay Raut : मी नारायण राणेंना मानतो संजय राऊतांनी असं नेमकं का म्हटलं? किस्सा इंटरेस्टिंगय!
| Edited By: | Updated on: Jun 26, 2022 | 10:49 AM

मुंबईः शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेर पडलेल्या नेत्यांचं आजवर कधीही भलं झालं नाही. ते राजकारणात (Maharashtra politics) प्रमुख पदापर्यंत पोहोचू शकले नाहीत, असा इतिहास शिवसेना नेत्यांकडून वारंवार सांगितला जातोय. नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेनेतील वाद कुठल्या थराला गेलेत, हेही संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. मात्र आज शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चक्क नारायण राणेंना मी मानतो… असे शब्द वापरले. ट्विटर आणि प्रतिक्रियांच्या माध्यमातून सातत्याने शिवसेनेला निशाणा करणाऱ्या राणेंचं नाव अशा प्रकारे राऊतांनी घेतल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. आज एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी जे काही चालवलय, त्यापेक्षा तर नारायण बरे असे म्हणण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे, त्याचं कारणही संजय राऊतांनी सांगितलं

काय म्हणाले संजय राऊत?

एकनाथ शिंदेसेनेसमोर नारायण राणेंचं बंड परवडलं, हे सांगताना संजय राऊत म्हणाले, ‘जे बाहेर गेले त्याची शिवसेना असू शकत नाहीत. नारायण राणेंना मानतो. त्यांनी राजीनामे दिले ते निवडणुकीला सामोरे गेले. मध्य प्रदेशात लोकं फुटले ते निवडणुकांना सामोरे गेले आणि निवडून आले. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांनीही हिंमत असेल तर राजीनामे द्यावेत.. 40 काय 54 असू द्या. मतदार संघात जाऊन निवडणुका लढवण्याची हिंमत दाखवा. तुम्ही तिथे बसून आम्हाला शिवसेनेच्या, निष्ठेच्या गोष्टी शिकवू नका…, असं आव्हान संजय राऊतांनी दिलं.

‘रोखठोक’ मधूनही बंडावर भाष्य

संजय राऊत यांनी सामनातील अग्रलेखातूनही शिवसेनेतून जे बाहेर गेले, त्यांची राजकीय कारकीर्द संपल्याचं ठसवून सांगितलंय. नारायण राणे यांनी बंड केले तेव्हा त्यांच्यासोबतही दहाच्या वर आमदार नव्हते. राणे यांचे कोकणात त्यावेळी महत्त्वाचे स्थान होते. राणे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रात पोट निवडणुका झाल्या. त्यात काही लोक जिंकले, पण नंतरच्या मध्यवधी निवडणुकीत राणे यांच्यासह बहुतेक सर्वच आमदार कोकणात पराभूत झाले आणि त्यांची राजकीय कारकीर्दच संपुष्टात आली, असा आरोप संजय राऊतांनी अग्रलेखातून केला आहे.

….तर आम्ही गुवाहटीत येतो..

दरम्यान, आमदारांनी त्यांची जी काही भूमिका आहे, ती महाराष्ट्रात येऊन मांडावी, असं वारंवार शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. मात्र गुवाहटीतील शिंदे गटातील आमदारांनी अद्याप यासंबंधीचा निर्णय घेतलेला नाही. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, आमदार इकडे येऊन उघडपणे बोलत नाहीत तर आम्ही ते ज्या हॉटेलमध्ये थांबलेत, त्याच हॉटेलमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करतोय, पण आम्हाला येऊ दिलं जात नाहीये. माझ्या माहितीप्रमाणे ते 18 माळ्यांचं हॉटेल आहे. तेथे 300 खोल्या आहेत. त्यापैकी काही खोल्या आम्ही बुक करण्यासाठी प्रयत्न करतोयत, पण आमच्या ईमेलला कुणीही उत्तरच देत नाहीये…