
राज्यातील शाळांमध्ये पहिल्या इयत्तेपासून हिंदी सक्तीच्या निर्णयाला कडाडून विरोध झाल्यानंतर अखेर फडणवीस सरकारने या संदर्भातील दोन्ही जीआर रद्द केले आहेत. तसेच त्रिभाषा धोरणाबाबत डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती स्थापन करून त्यांच्या अहवालानंतरच याबद्दलचे पुढील पाऊल ठरवण्यात येईल, असे सरकारने स्पष्ट केलं आहे. मात्र डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नियुक्तीबाबतही सर्व स्तरांतून विरोध होत असून पहिली ते पाचवी हिंदी नकोच अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही याबाबत भूमिका स्पष्ट केली होती. तर आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देत आपली बाजून मांडली. ‘समितीच्या अध्यक्षपदी नरेंद्र जाधव आले, भैय्याजी जोशी आले किंवा दत्तात्रय होसबळे आले तरी महाराष्ट्र या समितीचा कोणताही अहवाल स्वीकारणार नाही. आम्ही उलथवून लावू.’ अशा शब्दांत संजय राऊतांनी थेट विरोध केला आहे.
काय म्हणाले संजय राऊत ?
नरेंद्र जाधव हे अर्थ तज्ज्ञ आहेत. ते आरबीआयमध्ये होते. ते फायनान्स कमिशनला होते. ते संसदेत भाजपने नियुक्त केलेले राज्यसभेचे सदस्य होते. त्यांचा संघ परिवाराचा संबंध आहे. त्यांना उपराष्ट्रपती व्हायचं होतं आणि त्यांचं नाव यावं म्हणून संघ त्यांच्यासाठी प्रयत्न करत होते. अशा व्यक्तीला पुन्हा एकदा जेव्हा महाराष्ट्रातल्या महत्वाच्या समितीवर नेमलं जातं, समितीवर नेमलं जातं तेव्हा लोकांच्या मनात संशय येणारच. तो आमच्या मनात आहे, असं संजय राऊत म्हणाले.
अर्थात, या समितीच्या अध्यक्षपदी नरेंद्र जाधव आले, भैय्याजी जोशी आले किंवा दत्तात्रय होसबळे आले तरी महाराष्ट्र या समितीचा कोणताही अहवाल स्वीकारणार नाही. आम्ही उलथवून लावू, हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. त्यामुळे कुणी चिंता करू नये. महाराष्ट्राने ताकद दाखवली आहे. मराठीवरील अन्यायाच्या विरोधात आम्ही ताकद दाखवून देऊ, असा इशाराही राऊतांनी दिला.
राज्याच्या आयुष्यात नवीन पाडवा आणि दसरा उगवणार…
हिंदीसक्तीचा जीआर रद्द झाल्यानंतर येत्या 5 जुलै रोजी वरळीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेतर्फे विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याबद्दलही संजय राऊतांनी सांगितलं. ‘ सर्वांचं स्वागत आहे. या मेळाव्याची तयारी शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे हे दोनच पक्ष करत आहे. बाकी सर्वांना खुलं निमंत्रण आहे. या निमंत्रणानुसार जे येतील त्यांचं स्वागतच करू’ असं ते म्हणाले.
चार दिवसांपासून शिवसेना आणि मनसेचे प्रमुख लोकं त्या तयारीसाठी मैदानात आहेत. हा मेळावा यशस्वी व्हावा. लोकांची गैरसोय होऊ नये. लोकांचं आकर्षण उद्धव आणि राज ठाकरे एका मंचावर येतील महाराष्ट्राला संदेश देतील. हा आनंदाचा क्षण आहे. ज्यांना हा क्षण पाहायचा असेल त्यांनी आलं पाहिजे. राज्याच्या आयुष्यात नवीन पाडवा आणि दसरा उगवणार असेल तर लोकांची भूमिका असेल तर सर्व पक्षाच्या मराठी नेत्यांनी उपस्थित राहावं हे खुलं आवाहन आम्ही केलं आहे. त्यासाठी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या सहीने निमंत्रणं गेली आहेत, असंंही राऊतांनी नमूद केलं.