बाळासाहेबांची शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव, शिंदे त्यांचं हत्यार – संजय राऊत

संजय राऊत यांनी भाजपवर तीव्र हल्ला चढवला. भाजपला बाळासाहेबांची शिवसेना संपवायची आहे आणि एकनाथ शिंदे हे त्यांचे केवळ हत्यार आहे, असे ते म्हणाले. भाजपला मुंबई गिळायची असून मराठी माणसांत फूट पाडायची आहे. महाराष्ट्रावर किंवा मराठी माणसावर भाजपचे प्रेम नसून, केवळ राजकीय स्वार्थासाठीच ते असे करत असल्याचा आरोप राऊतांनी केला.

बाळासाहेबांची शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव, शिंदे त्यांचं हत्यार - संजय राऊत
संजय राऊत
| Updated on: Sep 27, 2025 | 10:50 AM

भाजपला महाराष्ट्र, मुंबई, मराठी माणसाबद्दल काही प्रेम नाहीये. त्यांना बाळासाहेबांची शिवसेना संपवायची आहे, आणि त्यासाठी एकनाथ शिंदे हे त्यांचं हत्यार आहेत अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे नेते, संजय राऊत यांनी कडाडून टीका केली. भाजपचा शिवसेनेवर किंवा शिंदेंवर प्रेमाचा झरा वाहतोय असं नाही, त्यांना मराठी माणसांत फूट पाडायची आहे, असा हल्लाही राऊतांनी चढवला.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की मुंबईत आम्ही महायुती म्हणून लढू , पण ठाण्यात युती होईल असं वाटतं नाही. ठाण्यात शिंदेंचा शिवसेना पक्ष आणि भाजप वेगवेगळे लढतील, असं चित्र दिसत आहे. अजित पवारांनीही स्थानिक स्वराज्य संस्था स्वत:च्या ताकदीवर लढण्याचे संकेत दिले आहेत. याबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता संजय राऊतांन कडाडून टीका केली.

त्यांना मुंबई गिळायची आहे

हा त्यांच्या अनैसर्गिक युतीचा प्रश्न आहे, त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मुंबईत त्यांना का लढायचं आहे, तर त्यांना मुंबई गिळायची आहे. मराठी माणसात परत फूट पाडायची आहे, त्यासाठीच आमचं (शिवसेना) पक्ष आणि चिन्ह त्यांना (शिंदेंना) दिला, बाकी उद्देश काय त्यांचा. भाजपचा शिवसेनेवर किंवा शिंदेंवर प्रेमाचा झरा वाहतोय असं नाही. त्यांना फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला संपवायचं आहे, एकनाथ शिंदे हे त्यासाठीचं हत्यार आहे. शरद पवाराचं अस्तित्व संपवायचं आहे, त्यासाठी अजित पवार हत्यार आहेत, असा आरोप राऊतांनी केला.

शिंद्यांचा पक्ष हा अमित शहांची बेनामी कंपनी

त्यांना (भाजप) मुंबई, महाराष्ट्राची, मराठी माणसाची काळजी आहे, असं नाही. त्यामुळे ते शिंदेंच्या पक्षाच्या तोंडावर किती तुकडे फेकतात हे पहावं लागेल. एकनाथ शिंदे यांना 100 जागाही मिळणार नाहीत असा दावा राऊत यांनी केला. मूळ शिवसेना (आम्ही) ठरवायचो की कोणाला किती जागा द्यायच्या ते, आता हे (शिंदे) त्यांच्या दारात आश्रितासारखे उभे आहेत की आमच्याशी युती करा आणि आम्हाला जागा द्या. कारण त्यांचे नेते अमित शहा आणि नरेंद्र मोदी आहेत. शिंद्यांचा पक्ष हा अमित शहांची बेनामी कंपनी आहे. त्याच्यात त्यांचं फार मन गुंतलं आहे असा भाग नाही. त्यांना काहीच मिळणार नाही, 5-25 जागा तोंडावर फेकल्या जातील आणि त्यांना म्हणतील की मराठी माणसाची मतं फोडा, मराठी माणसात फूट पाडा. ही सुपारी आहे, ही लोकं सगळी सुपारीबाज आहेत, सुपाऱ्या देतात घेतात, त्यामध्ये महाराष्ट्राचं नुकसान होतं अशी टीका राऊतांनी केली.