
महाराष्ट्रात आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन करणार आहे. महायुतीच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी करा, ही या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीकडून निवडणुकीत मतांची चोरी झाली याविरोधात सर्व खासदार एकत्र येत केंद्रीय निवडणूक आयोगावर मोर्चा काढणार आहेत. आता याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले. निवडणूक आयोग म्हणजे दुतोंडी गांडुळ आहे. निवडणूक आयोगावर आमचा स्वत:चा विश्वास नाही, अशा शब्दात संजय राऊतांनी टीका केली.
संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. आज दोन महत्त्वाचे आंदोलन आहेत. महाराष्ट्रात सरकारविरोधात जनआक्रोश आंदोलन आहे. राज्यभरात हे आंदोलन होणार आहे. उद्धव ठाकरे हे या आंदोलनात सहभागी होणार आहे. हे आंदोलन अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासोबतच दिल्लीत इंडिया आघाडीचे निवडणूक आयोगाविरुद्ध मोर्चा काढला जाणार आहे. संसद भवनापासून ते निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढणार आहोत. ज्या पद्धतीने निवडणूक आयोग विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतय, लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवतंय, सरकारच्या दबावाखाली काम करतंय, महाराष्ट्रापासून बिहारपर्यंत मतदार याद्यांतील घोटाळे समोर येतात. ईव्हीएम संदर्भातील प्रश्न निर्माण होतात, त्यावर निवडणूक आयोग हे पूर्णपणे सरकारचे हस्तक म्हणून काम करतंय. आम्हाला प्रत्यक्ष जाऊन निवडणूक आयोगाला जाब विचारावा लागेल. हे जनजागृतीपर आंदोलन आहे. लोकांमध्ये जनजागृती व्हायला पाहिजे, यासाठी हा दिल्लीतील मोर्चा आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
जिथे काँग्रेसची सत्ता आहे तिथे भाजप आंदोलन करत आहे. मग आम्ही जर आंदोलन करत असू तर त्याला रोखण्याचे कारण काय, ही इमर्जन्सी किंवा सेन्सॉरशिप काय लावलं आहे. आम्हाला अटक करुन आत टाकतील, चालेल आम्हाला, आमची तयारी आहे. आम्ही महाराष्ट्रात निवडणूक आयोगाला पुरावे दिले, पण त्यांनी काय केलं. हा निवडणूक आयोग म्हणजे दुतोंडी गांडुळ आहे. निवडणूक आयोगावर आमचा स्वत:चा विश्वास नाही. शिवसेना हे नाव आणि चिन्ह हे कसं चोरून कसं दुसऱ्या चोरांच्या हातात दिलं, हे आम्ही पाहिलंय. त्यामुळे निवडणूक आयोगाने आम्हाला या गोष्टी सांगू नये. निवडणूक आयोग हा भाजपचा हस्तक आणि प्रवक्ता आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाचे प्रवक्तेपद स्वीकारलं असेल तर त्यांनी सांगावं. या संपूर्ण देशातील विरोधी पक्ष हा एकत्र एकवटला आहे आणि निवडणूक आयोगाविरुद्ध लढाई लढत आहे. निवडणूक आयोगाचे जे कोणी लाभार्थी आहेत, त्यापैकी एक हे देवेंद्र फडणवीस आहेत. ते निवडणूक आयोगाच्या दरोड्यातील लाभार्थी आहेत. तेव्हा दरोड्यातील लाभार्थी देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाची बाजू घेतली यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. त्यांच्याकडे चोरीचा माल आहे. चोराने गप्प राहिले पाहिजे, अशी टीका संजय राऊतांनी केली.