महाराष्ट्रातले पेपर लीक प्रकरणातील आरोपी भाजपचे सदस्य; संजय राऊतांनी राज्यसभा दणाणून सोडली
देशभरात सध्या नीट परीक्षा पेपर लीकचं प्रकरण चांगलंच गाजत आहे, याच मुद्द्यावर सीजेपीच्या वतीनं मोठं आंदोलन देखील उभारण्यात आलं. दरम्यान आता यावर राज्यसभेत बोलताना खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

राज्यासह देशभरात सध्या नीट परीक्षा पेपर लीक प्रकरण चांगलंच गाजत आहे. या प्रकरणात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने मोठं आंदोलन देखील दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर उभारणयात आलं होतं. याच मुद्द्यावरून विरोधकांकडून देखील सरकारच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान आज राज्यसभेत बोलताना संजय राऊत यांनी नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणावर बोलताना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पेपर फुटीप्रकरणी सर्वाधिक लोक महाराष्ट्रातून पकडले गेले आहेत. 8 लोकांना अटक झाली आहे. पेपर लीक प्रकरणातील सर्व लोक भाजपचे सदस्य आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले राऊत?
‘आम्हाला तुम्हाला घाबरण्याची ही गोष्ट नाही. मी महाराष्ट्राची गोष्ट सांगतो. पेपर लीक कसा होतो सांगतो. पेपर फुटीप्रकरणी सर्वाधिक लोक महाराष्ट्रातून पकडले गेले आहेत. ८ लोकांना अटक झाली आहे. पेपर लीक प्रकरणातील सर्व लोक भाजपचे सदस्य आहेत. हे मला दुर्देवाने सांगावे लागत आहे. नीट परीक्षा ही विद्यार्थ्यांचं भविष्य घडवत असते. परंतु ही व्यवस्था सिस्टिम फेल्युअर झाल्याने कोलमडत असेल तर मुलांच्या भविष्यासाठी मोठा धोका आहे.
आमची मुलं उपोषणाला बसले आहेत. तेव्हा तुमची वेळ संपली नाही आणि आता मला वेळ संपलीय म्हणून सांगता. नव्या कायद्याने काही होणार नाही. वरूनपासून खालपर्यंत पेपर लीक होत आहेत. तुम्ही महान लोकांना मोठ्या पदावर बसवता, पण ते न्याय देत नाही. तुम्ही व्यवस्थेला बरबाद केलं आहे. ज्या देशात राम मंदिराचं दान चोरी होतं त्या देशात पेपर लीक होतोय यात सर्व आलंय, असा घणाघात यावेळी संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे.
दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी सीजेपीच्या वतीने मोठं आंदोलन उभारण्यात आलं होतं, या आंदोलनाला देखील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला होता, तसेच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने मुंबईत जल्लोष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.