शाह आणि आयोगाने मिळून बाळासाहेबांचा पक्ष, चिन्ह विकलं; संजय राऊतांची बोचरी टीका
शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणाचं यावर गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली, यावर बोलताना आता पुन्हा एकदा संजय राऊत यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

गुरुवारी पुन्हा एकदा शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं? यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली, यावेळी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडताना जोरदार युक्तिवाद केला आहे. दरम्यान या सुनावणीवर प्रतिक्रिया देताना आज संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शाह आणि आयोगाने मिळून बळासाहेबांचा पक्ष आणि चिन्ह विकलं असा घणाघात यावेळी राऊत यांनी केला आहे. तसेच तृणमूल पक्षाला फोडणं, शिवसेनेला फोडणं, राष्ट्रवादीला फोडणं हे पंतप्रधान आणि अमित शाह यांचं काम आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
नेमकं काय म्हणाले राऊत?
ज्या पद्धतीने डिलिमिटेशन बिल मंजूर होण्यासाठी आजही खासदार फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा प्रकार म्हणजे संविधान गुदमरण्यासारखा आहे. शिवसेना फोडणं, तृणमूल फोडणं, राष्ट्रवादी फोडणं, हे प्रतप्रधान आणि गृहमंत्री अमित शाह यांचं काम आहे का? काश्मीरला हल्ले होत आहेत, मणिपूर पेटलेलं आहे. देशामध्ये अस्वस्थता आहे, तरुण वर्ग चिडलेला आहे. बेरोजगारी वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे. रुपया घसरत आहे, देशाची पत घसरत आहे, यावर प्रधानमंत्री यांना टेली प्रॉम्टरशिवाय बोलता येईल का? या दोघांना 2029 पूर्वी जावं लागेल अशी परिस्थिती जागतिक स्थरावर देखील आहे, आणि आपल्या देशात देखील आहे. 2029 पूर्वी मोदी आणि शाह जातील ते राजीनामा देतील, असा दावा यावेळी राऊत यांनी केला आहे. दरम्यान राष्ट्राध्यक्षांना घट्ट मिठी मारणं म्हणजे परराष्ट्र धोरणं नसतं, असंही यावेळी राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान शिवसेना पक्ष आणि चिन्ह यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे, यावरून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला आहे. अपात्र ठरलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्री केलं हे घटनाविरोधी असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच निवडणूक आयोगाने शिवसेना विकल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.