कल्याणमध्ये 22 कोटींच्या जमीन घोटाळ्यात शेतकऱ्याला फसवलं, डेव्हलपर्सने पळ काढला, काय आहे संपूर्ण प्रकरण?
कल्याणमध्ये 22 कोटींच्या जमीन घोटाळ्यात शेतकऱ्याला फसवल्याचे समोर आलं आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर डेव्हलपर्सने पळ काढला.

सुनील जाधव : कल्याण पश्चिमेत शेतकऱ्याची करोडो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. कल्याण पश्चिमेतील गांधारी गावात 111 गुंठे जमीन विकासासाठी घेऊन विकासकाने शेतकऱ्यांची तब्बल 22 कोटी 50 लाखांची फसवणूक केली. ठाणे EOW ( आर्थिक गुन्हे शाखा) च्या चौकशीनंतर रॉईस डेव्हलपर्सचे संजय कणकोशे, गीता पटेल आणि मीत पटेल यांच्याविरोधात विविध कलमा अंतर्गत खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण पश्चिमेतील गांधारी गावात शेतकऱ्यांच्या 111 गुंठे जमिनीचा विकास करण्यासाठी घेतल्यानंतर त्यांना करारानुसार सदनिका, गाळे आणि बांधकाम क्षेत्र न देता शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी विकासकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या मालकीच्या सदनिका आणि गाळे परस्पर विकणे, गाळे बँकेत तारण ठेवणे आणि ठरलेला मोबदला न देणे, अशा विविध प्रकारांमधून तब्बल 22 कोटी 50 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार आहे. ठाणे EOW कडे तक्रार केल्यानंतर चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर खडकपाडा पोलीस ठाण्यात गांधारी गावातील शेतकऱ्यांच्या 111 गुंठे जमिनीच्या विकासाच्या व्यवहारातून 22 कोटी 50 लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी रॉईस डेव्हलपर्सचे संजय शांताराम कणकोशे, गीता राकेश पटेल आणि मीत राकेश पटेल यांच्याविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी आणि आमचे इतर विकास करारही रद्द करण्यात यावेत, अशी मागणी शेतकरी कुटुंबीयांनी केली आहे.
कल्याण पश्चिमेतील गांधारी गावातील पाच शेतकरी कुटुंबांच्या मालकीची तब्बल 111 गुंठे जमीन 2011 मध्ये विकासासाठी राईस डेव्हलपर्सकडे देण्यात आली होती.विकास करारानुसार जमीन मालकांना मंजूर बांधकाम क्षेत्रापैकी 50 टक्के हिस्सा आणि टीडीआरमधील 30 टक्के विक्रीयोग्य बांधकाम देण्याचे ठरले होते. त्यामध्ये सदनिका, दुकान गाळे आणि ऑफिस गाळ्यांचा समावेश होता.या जमिनीवर 2012 पासून बांधकाम सुरू झाले आणि 2022 पर्यंत सात इमारतींचे बांधकाम करण्यात आले. मात्र करारानुसार शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मालमत्तेचा पूर्ण हिस्सा मिळाला नसल्याचे फिर्यादीत नमूद आहे.शेतकऱ्यांना अलॉटमेंट लेटर देण्यात आलेल्या काही सदनिका त्यांच्या परवानगीशिवाय विकण्यात आल्याचे, तर काही गाळे बँकेकडे मॉर्गेज ठेवून कर्ज घेण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पार्किंग आणि ओपन पार्किंगच्या जागेबाबतही व्यवहार झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.तसेच विकासकाम सुरू असताना शेतकऱ्यांना भाडे देण्याचे ठरले होते, मात्र ते भाडेही मिळाले नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या नावाने बनावट कागदपत्रे आणि एफिडेविट तयार करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.या सर्व प्रकारातून शेतकरी कुटुंबाचे सुमारे 22 कोटी 50 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.याप्रकरणी शेतकऱ्यांनी आधी ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली.
EOW कडून चौकशी आणि पाठपुरावा झाल्यानंतर खडकपाडा पोलीस ठाण्यात रॉईस डेव्हलपर्सचे संजय शांताराम कणकोशे, गीता राकेश पटेल आणि मीत राकेश पटेल यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 338, 340 आणि 61(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, 2011 मध्ये विकास करण्याचे सांगून आमची 111 गुंठे जमीन विकासासाठी दिली. मात्र ठरल्याप्रमाणे आम्हाला सदनिका आणि गाळे मिळाले नाहीत. आमचे गाळे, सदनिका आणि पार्किंगची जागाही परस्पर विकण्यात आली. आम्ही EOW कडे तक्रार करून पाठपुरावा केला. आता गुन्हा दाखल झाला असून आम्हाला आमची नुकसानभरपाई मिळावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी. आणि आमचे इतर विकास करारही रद्द करण्यात यावेत, अशी मागणी शेतकरी कुटुंबीयांनी केली आहे.
