Sanjay Raut : कोणी कितीही आदळआपट केली तरी ठाकरेंच्या युतीत मिठाचा खडा पडणार नाही – राऊतांनी सुनावलं

चंद्रपूरमधील घडामोडींवरून शिवसेना आणि मनसेत वाद पेटला असताना, संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, पक्षाची त्यात भूमिका नाही. मनसेने केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना, राऊत यांनी ठाकरे बंधूंची युती अतिशय घट्ट असल्याचे ठामपणे सांगितले. कोणी कितीही प्रयत्न केले तरी या युतीत मिठाचा खडा पडणार नाही, असे त्यांनी अधोरेखित केले.

Sanjay Raut :  कोणी कितीही आदळआपट केली तरी ठाकरेंच्या युतीत मिठाचा खडा पडणार नाही - राऊतांनी सुनावलं
ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल काय म्हणाले राऊत ?
| Updated on: Feb 14, 2026 | 11:59 AM

चंद्रपूरमध्ये घडलेल्या घडामोडींवर शिवसेना- मनसेत जुंपल्याचे पहायला मिळत आहे. संजय राऊत आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आरोप प्रत्यारोप केले आहेत. चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या नगरसेवकांना प्रत्येकी एक कोटी रुपये मिळाल्याचा खळबळजनक दावा संदीप देशपांडे यांनी केला होता. त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत चंद्रपूरमधील स्थानिक राजकीय घडामोडींवर स्पष्टीकरण दिले. चंद्रपूर येथे जे घडले, त्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कोणतीही भूमिका नाही, असे राऊतांनी ठामपणे सांगितले. चंद्रपूरमधील काही स्थानिक लोकांनी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी पक्षाला अंधारात ठेवून काही निर्णय घेतले असावेत. पक्षाने या घडामोडींना कधीही समर्थन दिलेले नाही, असे त्यांनी अधोरेखित केले. तर त्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही ठाकरेंच्या सेनेला सुनावलं. संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांच्या 50 खोक्यांच्या आरोपांवरून जोरदार प्रत्युत्तर दिलं. जनतेला 50 खोक्यांचे पुरावे सादर केल्यास चंद्रपूर येथील एक खोक्याचा पुरावा देणार असल्याचे ट्वीट त्यांनी केलं होतं.

आज संजय राऊत हे माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांना पुन्हा या घडामोडींवरून प्रश्न विचारण्यात आले. चंद्रपूरमध्ये जे घडलं त्यावर तुम्ही प्रतिक्रिया दिली, मग मनसेच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. त्यावर पुढचा अध्याय म्हणजे काल मनसेच्या नेत्यांनी तुमच्यावर आरोप केले आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी शिवसेना उबाठाच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मदत केली नाही. अनेक ठिकाणी आम्हाला जागा मिळाल्या नाहीत, अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे केले गेले, अनेक ठिकाणी आमचे उमेदवार असताना एबी फॉर्म दिले गेले. अशी मनसेच्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची भावना आहे. ही भावना राज ठाकरे यांच्यासमोरही व्यक्त करण्यात आली. या सर्व मुद्यावर संजय राऊतांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं.

माझी राज ठाकरेंशी परवा चर्चा झाली. आम्ही बोललो. तुम्ही जे म्हणताय ( कार्यकर्ते बोलले त्याबद्दल), ते जेव्हा स्वत: मनसे प्रमुख राज ठाकरे बोलतील, तेव्हा आम्ही त्यावर आमची प्रतिक्रिया देऊ. आता जे कोण काय बोलतंय, बंद दाराआड, भिंतीआड, त्याच्यावर आम्ही का बोलू? एक लक्षात घ्या मनसे आणि शिवसेना यांची युती अतिशय घट्ट आहे. कोणी काहीही बोललं तरी त्या युतीमध्ये मिठाचा खडा काही पडणार नाही. कोणाची कितीही इच्छा असली तरी ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा पडणार नाही, याचा पुनरुच्चार राऊत यांनी केला

Follow Us