‘उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुलंही सांभाळता येत नाहीयेत’… शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल, राजकारण तापलं

Subhash Desai News | सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलंय. संजय राऊतांच्या टीकेवरून संजय शिरसाट यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुलंही सांभाळता येत नाहीयेत... शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल, राजकारण तापलं
Image Credit source: social media
| Updated on: Mar 14, 2023 | 2:12 PM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने (Shivsena) आधी बाप पळवले, आता मुलंही पळवत आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. त्यावरून आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. यावरून संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. शिंदे गटाने आधी बाप पळवले, आता मुलंही पळवत आहेत, अशी विखारी टीका त्यांनी केली. त्यावरून औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय. त्यांच्या शिवसेनेला आता मुलंही सांभाळता येत नाहीतेय, अशी टीका शिरसाट यांनी केली आहे.

संजय शिरसाट काय म्हणाले?

संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेवर संजय शिरसाट म्हणाले, ‘संजय राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडले आहे. ते काय बोलतात त्याला महत्त्व नाहीये. संजय राऊत जर म्हणत असतील की, आधी बाप पळवले आता मुलं पळवत आहेत तर… अरे मुलांनाही संभाळता येत नाही अशी तुमची अवस्था आहे. त्यामुळे याबद्दल तुम्हीच बोलू नये. एक एक करून पक्ष रिकामा व्हायला लागलाय. तरीदेखील तुम्ही तुमच्या तोऱ्यामध्ये आहात, हे साफ चुकीचा आहे. आम्ही आमचं काम करतोय. आमचा पक्ष वाढवतोय, असं स्पष्टीकरण शिरसाट यांनी दिलंय.

‘शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होतील’

शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आज हजारो शेतकरी आंदोलनात उतरले आहेत. त्यावरून संजय शिरसाट म्हणाले, ‘ सरकार शेतकऱ्यांच्या हिताचाच निर्णय घेत आहे आणि शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सरकार पूर्ण करेल. तर जुन्या पेन्शन योजनेचा जो मुद्दा आहे तो काही आजचा मुद्दा नाहीये. तो काँग्रेसच्या काळातलाच मुद्दा आहे. त्यावर एकत्र बसून तोडगा निघावा, अशी आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेला संलग्न आम्ही काम करत आहोत.

काही लोकांना त्रास होणार…

शिवसेना खटल्याची महत्त्वाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरु आहे. त्यावरून संजय शिरसाट म्हणाले, ‘ सुप्रीम कोर्टामध्ये आम्हाला न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि भविष्यामध्ये कॅबिनेटचा विस्तारही होईल पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की काही लोकांना मात्र भरपूर त्रास होणार आहे.’