एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते तर आज…; मनोज जरांगे पाटील यांचं मोठं वक्तव्य

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल करत मोठ वक्तव्य केलं आहे. त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात सुरू असलेल्या तपासावरून निशाणा साधला आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते तर आज...; मनोज जरांगे पाटील यांचं मोठं वक्तव्य
| Updated on: Feb 25, 2025 | 9:38 PM

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेला दोन महिने उलटून गेले आहेत. मात्र अद्यापही या प्रकरणातील आरोपींना शिक्षा झालेली नाही, तसेच एक आरोपी फरार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांचं कुटुंब आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील आज या आंदोलनाला भेट दिली. या भेटीनंतर सरकारवर हल्लाबोल करताना मनोज जरांगे पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे? 

आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असते तर या प्रकरणाचा निपटारा झाला असता, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. शिंदे साहेबांनी काम केलं, गाव खेड्यात शब्द असतो पहिला सरपंच होता खूप चांगलं काम होतं, दुसरा आल्यावर त्याच्यापेक्षा चांगलं काम केलं तर लोक म्हणतात पहिल्या सरपंचापेक्षा त्यांनं चांगलं काम केलं. शिंदेंचा कालखंड आम्ही बघितला, त्यांनी आंदोलनाला यशाकडे नेलं. सगळ्या जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम केलं, पण तुम्ही माणसं मरून सुद्धा न्याय देत नाहीत, माणसं मरून देखील आंदोलन करावं लागत आहे, असा हल्लाबोल यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

दरम्यान पुढे बोलताना संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात नियुक्त करण्यात आलेल्या एसआयटी, सीआयडीला तपासाचं स्वातंत्र्य नाही असा आरोप देखील त्यांनी केला आहे. त्यांना जर तापासाचं स्वातंत्र्य असतं तर  आज बीडचं अर्ध जेल भरलं असतं. दीडशे ते दोनशे सहआरोपी झाले असते. त्यामुळे हे सत्य आहे की, तपास यंत्रणेला स्वातंत्र्य नाही, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, मंत्री, आमदार, खासदार यांना वाटत असेल आम्ही खूप हुशार आहोत, पण जनता तुमच्यापेक्षाही हुशार आहे, सरकारचा छुपा अजेंडा सुरू आहे. गोड बोलून तीन महिने घातले असा आरोपही यावेळी जरांगे पाटील यांनी केला आहे.