
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज राज्यात काही मोठ्या घडामोडी घडू शकतात. मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली. आरोपींनी क्रौर्याच्या सगळ्या सीमा ओलांडल्या. या प्रकरणी तपासासाठी राज्य सरकारने SIT आणि CID ची स्थापना केली होती. शनिवारी या प्रकरणात सीआयडीने 1800 पानी आरोपपत्र दाखल केलं. या आरोपपत्रातून वाल्मिक कराडच मुख्य मास्टरमाइंड असल्याच समोर आलय. संतोष देशमुख यांची ज्या निदर्यतेने, क्रूरतेने हत्या करण्यात आली, त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. या फोटोंमधून आरोपींचे चेहरे स्पष्ट पाहायला मिळत आहेत. संतोष देशमुखांना झालेल्या मारहाणीचे 8 फोटो आणि 15 व्हिडीओ समोर आले आहेत. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहेत. हे सर्व फोटो संवेदनशील आहेत. त्यामुळे हे फोटो आम्ही प्रसिद्ध करु शकत नाही तसेच ‘टीव्ही 9 मराठी’ या फोटोंना दुजोरा देत नाही.
विधानसभेच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना हे फोटो आणि व्हिडिओ बाहेर आलेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघण्याची शक्यता आहे. आज विधानसभा आणि विधान परिषदेत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंचे पडसाद उमटू शकतात. महाविकास आघाडीच्या आमदारांकडून सरकारला धारेवर धरलं जाऊ शकतं. बीडचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची पुन्हा एकदा मागणी केली जाऊ शकते.
फोटो व्हायरल झाल्यावर महत्त्वाची बैठक
कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य मास्टरमाइंड वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. याआधी सुद्धा याच मुद्यावरुन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. पण सरकारने त्यांचा राजीनामा घेतला नाही. दरम्यानच्या काळात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. आता संतोष देशमुख यांच्या हत्येच्या व्हायरल झालेल्या फोटोंमुळे सरकारच्या अडचणी वाढू शकतात. हे फोटो समोर आल्यानंतर काल देवगिरीवर एक महत्त्वाची बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, मंत्री धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर मोठी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे.