
Satara Phaltan Doctor Death Case : सातारा जिल्ह्यातील फलटण येथे नोकरी करत असलेल्या डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आमच्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे, असा दावा डॉक्टर महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. दुसरीकडे डॉक्टर महिलेच्या शवविच्छेदन अहवालात तिचा गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले असून शरीरावर अन्यत्र कुठेही जखमा नाहीत, असेही नमूद करण्यात आले आहे. या सर्व माहितीनंतर डॉक्टर महिलेच्या आत्महत्येचे नेमके कारण काय आहे? या प्रश्नाचे उत्तर अद्याप समजू शकलेले नाही. असे असतानाच आता एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. डॉक्टर महिलेने टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकर याला एक फोटो पाठवला होता.
या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलीस वेगवेगळ्या बाजू लक्षात घेऊन तपास करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार आता पोलिसांच्या हाती एक महत्त्वाची माहिती लागली आहे. डॉक्टर महिलेने फलटण येथील मधुदीप हॉटेलमध्ये चेकईन केल्यानंतर तिने प्रशांत बनकर याच्याशी संभाषणा केले होते. तिचा शेवटचा कॉल हा बनकर यालाच होता, असे म्हटले जात आहे. सोबतच आता मिळालेल्या नव्या माहितीनुसार गळफास घेण्याआधी डॉक्टर महिलेने बनकर याला एक सेल्फी फोटो पाठवला होता. या फोटोमध्ये लटकवलेल्या ओढणीचा एक सेल्फी फोटो डॉक्टर महिलेने बनकर याला व्हॉट्सअॅपद्वारे पाठवला होता. त्यामुळे आता या प्रकरणी नवा ट्विस्ट आला आहे.
डॉक्टर महिलेने बनकर याला हा गळपास घेण्यासाठीच्या ओढणीसोबत सेल्फी फोटो का पाठवला होता, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. डॉक्टर महिलेने आत्महत्या करण्याआधी आपल्या तळहातावर पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर याचे नाव लिहिलेले आहे. सोबतच बनकर याने गेल्या काही महिन्यांपासून माझा शारीरिक आणि मानसिक छळ केलेला आहे, असेही डॉक्टर महिलेच्या तळहातावर पेनने लिहिलेले आहे. यासह निलंबित पीएसआय गोपाळ बदने याने माझा चार वेळा बलात्कार केला, असे डॉक्टर महिलेने आपल्या तळहातावर लिहिलेले आहे. त्यामुळे आता डॉक्टर महिलेने ओढणीचा सेल्फी नबकरला पाठवणे आणि तिच्या तळहातावर लिहिलेल्या संदेशात बनकरचे नाव असणे? याचा काही संबंध आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, डॉक्टर महिलेच्या तळहातावर जे काही लिहिलेले आहे, ते तिचे अक्षरच नाही, असा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. तर दुसरीकडे या हस्ताक्षराची तपासणी करण्यात येत असून त्याचा अहवाल पोलिसांना अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे आता या प्रकरणात भविष्यात नेमके काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.