भारत दक्षिण अफ्रिका सामन्यापूर्वी मोठी दुर्घटना टळली, झालं असं की…
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात वनडे मालिकेनंतर टी20 मालिका होणार आहे. ही मालिका 9 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ही मालिका पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह आहे. असं असताना एक मोठी दुर्घटना होता होता टळली. नेमकं काय झालं ते जाणून घ्या.

दक्षिण अफ्रिकेने भारतात येऊन टीम इंडियाला तोडीस तोड उत्तर दिलं आहे. कसोटी मालिकेत 2-0 ने धुव्वा उडवला. आता वनडे मालिकेतही दक्षिण अफ्रिकेने 359 धावांचा पाठलाग करून भारताला बॅकफूटवर ढकललं आहे. त्यामुळे तिसरा वनडे सामना अतितटीचा होणार यात काही शंका नाही. त्यामुळे या सामन्यात काय होते याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. दुसरीकडे, 9 डिसेंबरपासून टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत विराट आणि रोहित नसतील. पण अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादवची फलंदाजी पाहण्याची मजा काही औरच असणार आहे. या मालिकेत चौकार आणि षटकारांचा वर्षाव होईल यात काही शंका नाही. हे चित्र प्रत्यक्ष आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी क्रीडाप्रेमींचा आग्रह आहे. त्यासाठी त्यांची आतापासूनच धडपड सुरु झाली आहे. टी20 मालिकेच्या तिकीटासाठी आतापासून चाहते धावाधाव करत आहेत. अशा स्थितीत ओडिशामध्ये एक मोठी दुर्घटना होता होता टळली.
टी20 मालिकेतील पहिला सामना कटकमध्ये होणार आहे. या सामन्यासाठी 5 डिसेंबरपासून तिकीट विक्री सुरु झाली आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही बाजूने तिकिटांची विक्री सुरु आहे. असं असताना चाहत्यांनी ऑफलाईन तिकीट घेण्यासाठी एकच गर्दी केली. त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला. इतकंच काय चेंगराचेंगरी होते की काय अशी भीतीही वाटली. सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडिओंमध्ये गर्दी कशी नियंत्रणाबाहेर गेली होती हे दिसून येईल. तिकीट खरेदी करण्यासाठी लांब रांगा लागल्या होत्या आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसही गर्दी नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत होते.
Massive turnout at Barabati Stadium today as fans line up for India–South Africa T20 tickets.
One hopes @dcp_cuttack, @cpbbsrctc & @Satya0168 have ensured proper crowd-control arrangements, because the visuals below tell a different story–something essential is missing to keep… pic.twitter.com/heRx96QDFT
— Soumyajit Pattnaik (@soumyajit) December 5, 2025
अनियंत्रित गर्दीमुळे काय होऊ शकते हे आरसीबीने आयपीएल जेतेपद जिंकल्यानंतर दिसून आलं आहे. बंगळुरूत गर्दी झाली आणि चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता ताकही फुंकून पिण्याची गरज असल्याचं दिसत आहे. बीसीसीआयने यातून धडा घेणं आवश्यक आहे. दुसरीकडे ओडिशा क्रिकेट असोसिएशनच्या पद्धतींवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कारण ही चूक किती महागात पडली असती हे सांगता येत नाही. त्यामुळे बीसीसीआयने यासाठी ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे.
