Sharad Pawar : मुंबई कुणाची? शरद पवारांनी एका वाक्यात दिलं उत्तर, नेमकं काय म्हणाले?

Sharad Pawar on Mumbai : शरद पवार यांनी मुंबई कुणाची याबाबतही मोठं विधान केलं आहे. मुंबईतील ससून डॉक मच्छीमार बंदराची पाहणी केल्यानंतर शरद पवार नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

Sharad Pawar : मुंबई कुणाची? शरद पवारांनी एका वाक्यात दिलं उत्तर, नेमकं काय म्हणाले?
Sharad Pawar on Mumbai
Image Credit source: Google
| Updated on: Aug 28, 2026 | 6:12 PM

मुंबईतील ससून डॉक मच्छीमार बंदराची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पाहणी केली. यावेळी स्थानिक मच्छीमारांनी आपल्या विविध समस्या पवारांसमोर मांडत सरकारच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. ससून डॉक मच्छीमार बंदर बचाव कृती समितीच्या वतीने शरद पवार यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी भाषण करताना शरद पवार यांनी मुंबई कुणाची याबाबतही मोठं विधान केलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मच्छिमारांना शरद पवारांसमोर वाचला तक्रारींचा पाढा

ससून डॉक बंदरातील रखडलेल्या आणि अर्धवट कामांमुळे मच्छीमारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती मच्छिमारांनी शरद पवारांना दिली. अर्धवट काम सोडून मच्छीमारांना वाऱ्यावर सोडण्यात आलं आहे, अशी तक्रार स्थानिक मच्छीमारांनी केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मत्स्य व्यवसाय विभागाचे मंत्री नितेश राणे यांच्याबाबतही मच्छीमारांनी पवारांकडे तक्रारी मांडल्या.

मुंबई कुणाची?

यानंतर बोलताना शरद पवार यांनी मुंबई आणि मासेमारी व्यवसायाच्या जुन्या संबंधांचा उल्लेख केला. अनेक वर्षं एक प्रश्न उपस्थित होत आहे की मुंबई कुणाची? मुंबई ही मासेमारी करणाऱ्यांची आहे असं पवार म्हणाले. मासेमारीचा व्यवसाय अनेक ठिकाणी गेला असला तरी हा व्यवसाय आजही टिकून असल्याचं त्यांनी सांगितलं.

आठ दिवसात मुख्यमंत्री आणि मंत्र्यांशी बोलू…

मच्छीमारांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचं पवारांनी स्पष्ट केलं. अनेक प्रश्न आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी स्वतंत्र बसावं लागेल. येत्या आठ दिवसांत मी मुख्यमंत्री आणि या खात्याच्या मंत्र्यांची वेळ घेईन आणि तुमच्यासोबत समक्ष चर्चा करू असं आश्वासन त्यांनी मच्छिमारांना दिलं. तसेच मंत्रालय अगदी जवळ असताना मच्छीमारांना मदत करण्यासाठी आपण या प्रश्नांकडे लक्ष घालू, असंही पवार म्हणाले.

दरम्यान, आपल्या भाषणात पवारांनी मिश्किल शैलीत माझा संबंध मासे खाण्याचा आहे, असंही म्हटलं. तसेच मच्छीमारांच्या प्रश्नांवर सरकारसोबत एकत्रितपणे चर्चा करण्याची तयारी त्यांनी व्यक्त केली. आता शरद पवारांनी दिलेल्या आश्वासनानुसार पुढील आठ दिवसांत मुख्यमंत्री आणि मत्स्य व्यवसाय विभागाच्या मंत्र्यांसोबत बैठक होते का आणि ससून डॉकमधील रखडलेल्या कामांबाबत ठोस निर्णय घेतला जातो का, याकडे मच्छीमारांचं लक्ष लागलं आहे.

 

Follow Us