…यामध्ये काही चुकीचं नाही, पवार कुटुंबाच्या एकत्रिकरणावर शरद पवारांचं मोठं विधान!

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार शरद पवार हे चार ते पाच वेळा एकत्र आले आहेत. असे असतानाच आता शरद पवार यांनी पवार कुटुंबाच्या एकत्रिकरणावर भाष्य केलं आहे.

...यामध्ये काही चुकीचं नाही, पवार कुटुंबाच्या एकत्रिकरणावर शरद पवारांचं मोठं विधान!
sharad pawar and ajit pawar
| Updated on: Apr 22, 2025 | 5:24 PM

Sharad Pawar : गेल्या काही दिवसांपासून दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्यासंदर्भात वेगवेगळ्या चर्चा चालू आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार शरद पवार हे चार ते पाच वेळा एकत्र आले आहेत. असे असतानाच आता शरद पवार यांनी नुकतेच दोन्ही पवार कुटुंबाच्या एकत्रिकरणावर भाष्य केलं आहे. ते बारामतीत बोलत होते.

एकत्र येण्याची रोहित पवार, सुप्रिया सुळे यांची साद

गेल्या काही दिवसांत अजित पवार आणि शरद पवार बैठका, कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे काही बैठकांत तर ते एकमेकांच्या बाजूलादेखील बसलेले आहेत. दोघांमध्येही चर्चा झालेली आहे. असे असतानाच दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा चालू असताना पवार घराण्यातीलच आमदार रोहित पवार यांनी सर्वच कुटुंबांनी एकत्र यावे, असे म्हणत अजित पवार आणि शरद पवार यांना एकत्र येण्याची साद घातली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील महाराष्ट्रातल्या सर्वच कुटुंबांनी एकत्र यायला हवं, असं म्हटलं आहे. त्यामुळेच आता भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

शरद पवार एकत्र येण्यावर नेमकं काय म्हणाले?

याच चर्चेबाबत अजित पवार यांना विचारण्यात आलं होतं. आमच्या या भेटीतून राजकीय अर्थ काढू नका, असे अजित पवार यांनी सांगितलं. याच युतीच्या चर्चेवर आज खुद्द शरद पवार यांनीच महत्त्वाचं भाष्य केलंय. पवार कुटुंबाच्या एकत्र येण्यावर ते बोलले आहेत. जनतेच्या कामाच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो होतो. सरकारच्या प्रतिनिधीशी बोलणं यामध्ये काही चुकीचं नाही, असं शरद पवार यांनी म्हटलंय.

समेटीसाठी दरवाजे खुले?

दरम्यान, राजकारणात काहीही होऊ शकतं. अजित पवार यांनी आपली वेगळी चूल मांडली असली तरी अजूनही त्यांचे शरद पवार यांच्याशी भावबंध कायम आहेत. मी शरद पवार यांना आजही दैवत मानतो, कालही मानत होतो, असे अजित पवार जाहीर सभेत म्हणालेले आहेत. तर सुप्रिया सुळे यांनीदेखील माझ्यासाठी कुटुंब महत्त्वाचं आहे म्हणत समेट घडवून आणण्यासाठी दरवाजे खुलेच ठेवलेले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि आगामी काळातील राजकारण पाहता नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.