
ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून शरद पवारांवर पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरु आहेत. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती समोर आली आहे. पण त्यांना पूर्णपणे बरं होण्यासाठी डॉक्टरांनी त्यांना पुढील ५ दिवस रुग्णालयातच राहून उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे शरद पवार हे रुग्णालयातच असणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांना गेल्या काही दिवसांपासून छातीत कफ (Chest Congestion) साचल्यामुळे अस्वस्थता जाणवत होती. यामुळे त्यांना श्वास घेण्यास अडथळा येत होता. तसेच बोलतानाही त्रास जाणवत होता. शरद पवारांचे वय जास्त आहे. त्यांच्याा वयोमानानुसार कोणताही धोका पत्करायचा नसल्याने त्यांना तातडीने पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
शरद पवारांना रुग्णालयात दाखल करताच रुबी हॉल क्लिनिकमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर विविध चाचण्या करण्यात आल्या आहेत. विविध औषधोपचारांद्वारे त्यांच्या छातीतील कफ कमी करण्यावर भर दिला जात आहे. शरद पवारांचा वाढता जनसंपर्क आणि धावपळ लक्षात घेता डॉक्टरांनी त्यांना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी पूर्णतः बेड रेस्ट घेण्यास सांगितले आहे.
शरद पवारांची प्रकृती स्थिर असली तरी संसर्ग वाढू नये म्हणून कार्यकर्त्यांना आणि इतर नेत्यांना सध्या रुग्णालयात भेटण्यास मनाई करण्यात आली आहे. डॉक्टरांच्या या ५ दिवसांच्या सल्ल्यामुळे शरद पवार यांचे आगामी सर्व नियोजित दौरे आणि गाठीभेटी रद्द करण्यात आल्या आहेत. साहेबांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचे कारण नाही, फक्त विश्रांतीसाठी त्यांना रुग्णालयात ठेवले आहे,” अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.
शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते आणि नेते उत्सुक आहेत. मात्र डॉक्टरांनी दिलेला विश्रांतीचा सल्ला पाहता सर्वांना संयम राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील काही दिवस त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. पूर्णतः बरे झाल्यानंतरच त्यांना डिस्चार्ज दिला जाईल. तोपर्यंत त्यांचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम स्थगित राहतील.