
“माळेगाव कारखाना हा या परिसरातील पहिला कारखाना आहे. त्या काळात शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन कारखाना काढला. त्या काळात मी विधानसभेत होतो. १९६७ ते आज २०२५ या ५८ वर्षात लोक मला निवडून देतात. कधी विधानसभेला, कधी लोकसभेला पाचसहा वेळेला. अलिकडे मी राज्यसभेच्या निवडणुकीत जिंकलो. ५८ वर्ष या देशात एक माणूस सतत पराभव न होता निवडून येतो असं उदाहरण देशात नाही. बारामतीकरांनी हे घडवून आणलं” असं शरद पवार म्हणाले. “या ५८ वर्षात राज्य पातळीवर, देशपातळीवर आणि स्थानिक पातळीवर अनेक संस्था आणि क्षेत्राशी संबंध आला. सहकारी संस्था या ग्रामीण महाराष्ट्राचा आत्मा आहे. ग्रामीण महाराष्ट्र सुधारायचा असेल, लोकांचं जीवन बदलायचं असेल, तर सहकारी संस्थांना मदत केली पाहिजे. आज हा दृष्टीकोण आम्ही कायम ठेवला” असं शरद पवारांनी सांगितलं. ते माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभासदांशी बोलत होते.
“अनेक चेअरमन होते. सर्वांनी माझ्यासोबत काम केलं. आम्ही राजकारण आणलं नाही. मी सहकारात राजकारण आणलं नाही. माझी इच्छाच नाही. राज्य पातळीवर आणि देशातही. माझा दृष्टीकोण सर्वांना मदत करायचा असतो. मी कारखान्यात कधी कोणतं पद घेतलं नाही. पद इतरांना द्यायचं आणि इतरांना मोठं करायचं हे सूत्र घेतलं. मीच पद घेतलं तर काय होईल? इतरांना संधी देण्याची भूमिका मी सातत्याने घेतली आहे. मी तुमच्या कार्यक्रमाला येत जाईन” असं शरद पवार म्हणाले.
फक्त शेतकऱ्यांचं हित पाहिलं
“मी स्वत:साठी काही मागितलं नाही. काही आवश्यक नव्हतं. शेती खातं माझ्याकडे होतं. त्यावेळी निर्णय घेताना मी हा भाजपचा आहे का, हा राष्ट्रवादीचा आहे का हे कधी बघितलं नाही. फक्त शेतकऱ्यांचं हित पाहिलं. शेतकऱ्यांना फायदा होतोय ना, हे पाहायचो” असं शरद पवार म्हणाले.
आपण स्वच्छ निवडणूक करायची
“एकाने १५-२० मतदारांची जबाबदारी वाटून घ्या. मतदारांना घेऊन या. मतदान होईल हे पाहा. काही लोक सत्तेचा गैरवापर करतील, काही लोक आणखी काही देणंघेणं करतील. काही वाट्टेल ते झालं तरी चालेल, कुणाला काय करायचं ते करावं. पण आपण स्वच्छ निवडणूक करायची. आपण कोणत्याही परिस्थितीत जे मत आहे, आपला अधिकार हा कुणाला विकायचा नाही. आपल्याला संस्थेच्या हिताचं आणि संसाराच्या हिताचा विचार करून मतदान करायचं आहे. हे काम करा. ही अपेक्षा आहे” असं शरद पवारांनी सभासदांना आवाहन केलं.
माळेगाव कारखाना निवडणूक ही स्थानिक
“माळेगाव कारखान्याकडे राज्याचे लक्ष लागले हे कशावरून, शरद पवार यांचा सवाल. राज्यात औरंगाबाद आहे, मुंबई आहे तेथील प्रश्न आहेत. माळेगाव कारखाना निवडणूक ही स्थानिक आहे. येथील कार्यक्षेत्रातील सभासद त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्या हिताचा निर्णय करण्यासाठी ते सज्ज आहेत” असं शरद पवार म्हणाले.
कार्यकर्त्यांची इच्छा होती निवडणूक लढायची
“कार्यकर्त्यांची इच्छा होती निवडणूक लढायची. एक तर आमची कुठलीही इच्छा नव्हती, आजही नाही. कदाचित या निवडणुकीत आमचे काही उमेदवार घेतले असते, तर ही वेळ आली नसती. झालं हे झालं पण हे आम्ही दीर्घकालीन समजत नाही. हा तात्पुरता या कारखान्यातील एकोणीस हजार सभासदांपुढचा विषय आहे”
म्हणून सूतगिरणीचा प्रोजेक्ट आम्ही सोडून दिला
“सूतगिरणी झालीच नाही. गंमत अशी आहे माळेगाव कार्यक्षेत्रात ऊस मोठ्या प्रमाणात आहे. एकेकाळी या भागात कापूस मोठ्या प्रमाणात होत होता. त्यावेळी तालुक्यातील सर्वांबरोबर चर्चा करून याबाबत निर्णय घ्यायचा, त्यावेळेस आम्ही असा निर्णय घेतला की कापूस असल्याशिवाय सूतगिरणी यशस्वी होणार नाही. त्यामुळे तो सूतगिरणीचा प्रोजेक्ट आम्ही सोडून दिला” असं शरद पवार म्हणाले.