शरद पवार, उद्धव आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एकत्र, थेट निवडणूक आयोगाकडे जाणार, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट

राज्यातील प्रमुख राजकीय नेते (शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे) मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. ते तिघे प्रथमच एकत्र येत असून त्यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्या एकत्र येण्यामागचं कारण तरी काय ?

शरद पवार, उद्धव आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एकत्र, थेट निवडणूक आयोगाकडे जाणार, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट
शरद पवार, उद्धव आणि राज ठाकरे प्रथमच एकत्र
| Updated on: Oct 14, 2025 | 8:59 AM

राज्याच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर येत आहे. शरद पवार, उद्धव आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. राज्यातील प्रमुख राजकीय नेते (शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे) मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निष्पक्ष, पारदर्शक आणि संविधानिक पद्धतीने व्हाव्यात, या मागणीसाठी हे शिष्टमंडळ भेटत आहे. लोकशाही बळकट करणे हा मुख्य उद्देश असून, यात कोणताही राजकीय हेतू नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा या शिष्टमंडळात समावेश असेल. महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर राज ठाकरे सहभागी होणे ही महत्त्वाचे मानले जाते.

कालच शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची महाविकास आघाडीसोबत चालण्याच्या चर्चांवर सकारात्मक भूमिका असल्याचे नमूद केले होते. त्यानंतर आता मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते एकत्र येऊन निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

भेटीमागचा हेतू काय ?

सर्वपक्षीय शिष्टमंडळात सहभागी होण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रण दिले आहे. लोकशाही बळकट व्हावी व निवडणूक यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ व्हावा हा भेटीचा मुख्य हेतू आहे. या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नसल्याने आपण सहभागी होऊन सर्वपक्षीय शिष्टमंडळाची प्रतिष्ठा वाढवावी, असे राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायतींच्या निवडणुका लवकरच जाहीर होतील. या निवडणुकांच्या यंत्रणा आणि प्रक्रियेवर कोणताही संशय राहू नये, निवडणुका निष्पक्षपातीपणे, पारदर्शक व संविधानाचे पूर्ण पालन व्हावे ही राजकीय पक्षांची भूमिका आहे, असे खासदार राऊत यांनी सांगितले. यावर निवडणूक आयोगाचे लक्ष वेधण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेट घेणार आहे.

अनेक वर्षांनी शरद पवार मंत्रालयात 

राज्याचे चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषविलेले शरद पवार हे मंत्रालयात कधी येत नाहीत. मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर त्यांनी तेथे भेट दिली होती. त्यामुळे पवार हे अनेक वर्षांनंतर मंत्रालयात येणार आहेत. दुसरीकडे, सर्वपक्षीय शिष्टमंडळात जाण्यावरून काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आहेत. काही जणांच्या मते मनसेबरोबर पक्षाच्या नेत्यांनी जाऊ नये, अशी भूमिका पक्षाच्या बैठकीत मांडण्यात आली.

राज्यातील नगर परिषदा व नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या व थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचनांसाठी 17ऑक्टोबरपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे.

नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावर आता 13 ऑक्टोबरऐवजी 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी 28 ऑक्टोबरऐवजी 31 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.