एकीलाही सोडलं नाही, महिलांचे अंघोळ करतानाचे चोरून… हॉटेल मालकच निघाला वासनांध; अख्खा बुलढाणा जिल्हा हादरला
शेगाव शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. हॉटेल मालकाने त्याच्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिलांसोबत नको ते कृत्य केल्याचे समोर आले आहे. यामधील एका महिलेने हिंमत दाखवत पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील एका हॉटेल मालकाने काम करणाऱ्या महिलांसोबत नको ते कृत्य केले. मालकाने आधी महिलांचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ आणि फूट काढले. नंतर ते व्हायरल करण्याची धमकी देत एका वासनांध हॉटेल मालकाने महिला कर्मचाऱ्याचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
शेगाव शहरातील खामगाव मार्गावर असलेल्या एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये अनेक महिला कर्मचारी आपल्या उदरनिर्वाहासाठी काम करतात. याच हॉटेलचा मालक ज्ञानेश्वर लिप्ते याने सर्व मर्यादा ओलांडत आपल्याच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका पीडित महिलेचे अंघोळ करतानाचे फोटो आणि व्हिडीओ चोरून काढले. हे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने पीडित महिलेला वारंवार ब्लॅकमेल केले.
केवळ धमकी देऊनच हा नराधम थांबला नाही, तर फोटो व्हायरल करण्याच्या भीतीखाली त्याने पीडित महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. या छळाला कंटाळलेल्या महिलेने अखेर हिंमत एकवटून पोलिसांकडे धाव घेतली आणि या संपूर्ण प्रकाराचा पाढा वाचला.
जातीवाचक शिवीगाळ आणि अत्याचार
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी ज्ञानेश्वर लिप्ते याने केवळ शारीरिक अत्याचारच केले नाहीत, तर तिला जातीवाचक शिवीगाळ करून तिचा मानसिक छळही केला. तसेच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एकीलाही सोडलं नसल्याचे म्हटले जात आहे.
पोलिसांची तत्पर कारवाई
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून शेगाव पोलिसांनी तातडीने पावले उचलली आहेत. पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपी ज्ञानेश्वर लिप्ते याच्या विरुद्ध लैंगिक अत्याचार (बलात्कार), विनयभंग ॲट्रॉसिटी (अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा) या कलमान्वये गंभीर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली असून सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे.
शेगाव शहरात संतापाची लाट
शेगावसारख्या पवित्र शहरात घडलेल्या या नीच कृत्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. हातावर पोट असलेल्या गरीब महिलांचा अशा प्रकारे गैरफायदा घेणाऱ्या नराधमाला कठोरतली कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. पोलिस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपीच्या मोबाईलमध्ये आणखी किती महिलांचे अशा प्रकारचे व्हिडीओ आहेत, याचा शोध घेतला जात आहे.