तृप्ती देसाई या मतदारसंघातून निवडणूक लढणार, साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर केली घोषणा

| Updated on: Aug 27, 2023 | 8:03 PM

सुप्रिया सुळे या जर भाजपच्या उमेदवार झाल्या, तरीदेखील मी विरोधात निवडणूक लढेन, असा दावा तृप्ती देसाई यांनी केला.

तृप्ती देसाई या मतदारसंघातून निवडणूक लढणार, साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर केली घोषणा
Follow us on

शिर्डी : भूमिका ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर देसाई या माध्यमांशी बोलत होत्या. तृप्ती देसाई म्हणाल्या, सुप्रिया सुळे हे महाविकास आघाडीच्या उमेदवार असतील. मला भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांकडून निवडणूक लढण्यासंदर्भात विचारणा झाली आहे. मला भाजपकडून उमेदवारी मिळाल्यास नक्कीच बारामतीत बदल घडेल, असा विश्वास तृप्ती देसाई यांनी व्यक्त केला. सुप्रिया सुळे या महाविकास आघाडीतून लढल्यास मी त्यांच्या विरोधातून निवडणूक लढेन. पण, सुप्रिया सुळे या जर भाजपच्या उमेदवार झाल्या, तरीदेखील मी विरोधात निवडणूक लढेन, असा दावा तृप्ती देसाई यांनी केला.

बारामतीमधून लोकसभा लढणार

तृप्ती देसाई म्हणाल्या, सुप्रिया सुळे तीन वेळा बारामतीतून खासदार झाल्या आहेत. यावेळी मला वाटलं होत राष्ट्रवादी काँग्रेस एखाद्या कार्यकर्त्याला बारामतीतून संधी देईल. मात्र सुप्रिया सुळे स्वतःच तयारी करतायेत. त्यांच्या मतदार संघात अनेक कामे झालेली नाहीत. लोकांना त्यांच नेतृत्व मान्य नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात मी बारामतीतून लोकसभा लढवणार असा दावा देसाई यांनी केलाय.

साईबाबा अनेकांचे श्रद्धास्थान

तृप्ती देसाई म्हणाल्या, साईबाबा हे अनेकांचे श्रध्दास्थान आहेत. ते कुठल्या जाती-पातीचे नाही. त्यांना अनेक जण देवाच्या स्वरूपात पुजतात. मात्र साईबाबांविषयी कोणीही उठून त्यांना एका विशिष्ट जातीचे असल्याचं दाखविण्याचा प्रयत्न करतायत. सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान असलेल्या साईबाबांविषयी भावना दुखावल्या जातील, असं वक्तव्य करणे थांबवावे. सरकारने अशी वक्तव्य करणाऱ्यांविरोधात दखल पात्र गुन्हे दाखल करावेत, असं आवाहन त्यांनी केलं.

राज्यातील राजकारण सध्या कोणत्या दिशेने चाललंय ? असा सवाल देसाई यांनी उपस्थित केला. अजित पवार हे भारतीय जनता पार्टीसोबत गेले. दुसरीकडे सुप्रिया सुळे म्हणतात, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली नाही. पण, असं काही नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. हे सत्य आहे. आता मी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढणार आहे. त्याची तयारी सुरू केली असल्याचंही त्या म्हणाल्या.