शिवसेनेत शिंदेंनी उठाव केला, पण या मंत्र्याचे पुतणे शरद पवारांना भेटले, शिवसेनेतील बड्या पदाधिकाऱ्याचा बॉम्बगोळा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुम्हाला आरोग्यमंत्री केले आहे. मात्र तुम्ही मुख्यमंत्र्यांनाच अल्टीमेटम देणार असाल तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. तुमचा एक पुतण्या शरद पवारांना भेटतो, दुसरा पुतण्या पक्षाला सांगतो की, आमचा विचार केला नाही तर आम्ही वेगळा विचार करू.

शिवसेनेत शिंदेंनी उठाव केला, पण या मंत्र्याचे पुतणे शरद पवारांना भेटले, शिवसेनेतील बड्या पदाधिकाऱ्याचा बॉम्बगोळा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
| Updated on: Aug 31, 2024 | 5:49 PM

महायुतीमधील तिन्ही पक्ष सध्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. शिवसेना मंत्री तानाजी सावंत यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केले होते. त्यानंतर भाजप प्रवक्ते महेश हाके यांनी अजित पवार यांच्यासोबत युती आमचे दुर्देव आहे, असे म्हटले. परंतु आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यानेच शिवसेना मंत्री तानाजी सावंत यांच्यावर मोठा आरोप केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत जनतेसाठी उठाव केला. मात्र नुकतेच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे शरद पवारांना पंढरपुरात जाऊन भेटले. आरोग्यमंत्र्यांनी मला पाठवले आहे, असा संदेश घेऊन त्यांनी ही भेट घेतली, असा दावा सोलापूर शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी केला आहे.

काय म्हणाले मनीष काळजे

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना पक्षातील शिवसैनिकानेच घरचा आहेर दिला आहे. मनीष काळजे म्हणाले की, तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी शरद पवार यांची नुकतीच भेट झाली. अनिल सावंत यांनी आरोग्यमंत्र्यांनी मला पाठवले आहे, असा संदेश शरद पवार यांना दिला. याबद्दलची माहिती आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली आहे. तानाजी सावंत यांनी पक्षाला अल्टीमेटम देण्याचा प्रयत्न करु नये. त्याचे परिणाम तुम्हाला भविष्यात भोगावे लागतील, असा इशारा मनीष काळजे यांनी दिला आहे.

पक्षावर मालकी हक्क दाखवू नका

आरोग्य मंत्र्यांच्या पुतण्याने शरद पवार यांची भेट घेतल्याने शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी सावंत यांच्यावर जोरदार हल्ला केला. तानाजी सावंत एकीकडे पुतण्या दुसरीकडे भाऊ यांच्या माध्यमातून पक्षाला वेठीस धरत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेसाठी शिवसेनेत उठाव केला. मात्र तानाजी सावंत मंत्रिमंडळात असताना त्यांचे पुतणे शरद पवारांना भेटत आहेत. ही भेटसुद्धा आरोग्यमंत्र्यांनी मला पाठवले आहे, असा संदेश देणारी होती. आरोग्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सोबत काम करत असताना एका पुतण्याला पाठवून पक्षाला अल्टीमेटम देणे आणि पक्षावर आपला मालकी हक्क दाखवणे बंद केले पाहिजे. हा प्रकार शिवसैनिक कधीही सहन करणार नाही, असे मनीष काळजे यांनी म्हटले.

…तर परिणाम भोगावे लागतील

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुम्हाला आरोग्यमंत्री केले आहे. मात्र तुम्ही मुख्यमंत्र्यांनाच अल्टीमेटम देणार असाल तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. तुमचा एक पुतण्या शरद पवारांना भेटतो, दुसरा पुतण्या पक्षाला सांगतो की, आमचा विचार केला नाही तर आम्ही वेगळा विचार करू. मागील इतिहास पहिला तर 2019 ला शहर मध्यच्या आमदारकीच्या वेळेस काय झाले, करमळ्यात काय झाले? ज्या पक्षात आपण राहता त्या पक्षालाच आपण संपवण्याचा किंवा आपल्याच पक्षाचे उमेदवार कशा पद्धतीने पडतील असा प्रयत्न जर होत असेल तर आम्ही शिवसैनिक हा प्रकार सहन करणार नाही. यासंदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत, असे मनीष काळजे यांनी सांगितले.