शिंदेंच्याच पक्षातील नेत्याचा मराठी सक्तीला विरोध, थेट पत्र लिहून केली मोठी मागणी; सरकार मोठा निर्णय घेणार?

रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीची करण्यात आली आहे. परंतु सत्तेत असलेल्या शिंदे गटाच्या नेत्याकडूनच याला विरोध करण्यात येत आहे. या निर्णयाबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी या नेत्याने केली आहे.

शिंदेंच्याच पक्षातील नेत्याचा मराठी सक्तीला विरोध, थेट पत्र लिहून केली मोठी मागणी; सरकार मोठा निर्णय घेणार?
auto taxi driver marathi compulsory
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 23, 2026 | 8:09 PM

Marathi Compulsory : राज्यात ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा आली पाहिजे, अशी भूमिका घेत राज्य सरकारने रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीची केली आहे. येत्या 1 मे रोजीपासून या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. परंतु सरकारच्या या निर्णयाला विरोध केला जातोय. राज्यातील साधारण 15 लाख रिक्षा, टॅक्सी चालक येत्या 4 मे रोजीपासून संपावर जाणार आहेत. त्यामुळे मुंबई, पुणे शहरासह संपूर्ण राज्यभरात लोकांच्या प्रवासाची मोठी समस्या निर्माण होऊ शकते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच पक्षाचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या परिवहन विभागाअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु आता शिंदे यांच्याच पक्षातून या निर्णयाला विरोध होत आहे. माजी खासदार संजय निरुपम यांनी या मराठी भाषा सक्तीच्या आदेशाला विरोध करत प्रताप सरनाईक यांना तसे थेट पत्र लिहिले आहे.

संजय निरुपम यांच्या पत्रात नेमके काय आहे?

माजी खासदार संजय निरुपम यांनी प्रताप सरनाईक यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सत्तीबाबत पुनर्विचार करावा, असी विनंती त्यात करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने दिनांक १ मे, पासून रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीचा घेतलेला निर्णय अनेक कष्टकरी चालकांच्या मनात भीती, संभ्रम नाणि असुरक्षिततेची भावना निर्माण करणारा ठरत आहे, असे संजय निरुपम आपल्या पत्रात म्हणाले आहेत.

भाषेच्या प्रेमाला सक्तीची चौकट घालणे……

मराठी भाषेचा सन्मान, तिचा अभिमान आणि तिचं जतन हे आपल्या प्रत्येकाच्या मनात खोलवर रुजलेलं आहे, याबाबत कोणतेही दुमत नाही. मात्र, भाषेच्या प्रेमाला सक्तीची चौकट घालणे आणि त्यासाठी परीक्षा लादणे, हे हजारो कष्टकरी चालकांच्या जगण्यावर आघात करणारे ठरू शकते, ही बाब आपल्या निदर्शनास अणून देत आहे, असेही या पत्रात म्हणण्यात आले आहे.

मनात भीती आणि असंतोष वाढत आहे

मुंबईसारख्या बहुसांस्कृतिक महानगरात सुमारे ७० टक्क्यांहून अधिक रिक्षा व टॅक्सी चालक हे गुजरात, उत्तर भारत, पंजाब तसेच दक्षिण भारतातील विविध भागांतून येथे आलेले आहेत. त्यांनी आपल्या कष्टाने या शहरात स्थान निर्माण केलेले आहे. त्यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह प्रामाणिकपणे चालवला आहे आणि मुंबईच्या गतिमान जीवनशैलीला चालना दिली आहे. अशा वेळी या निर्णयामुळे त्यांच्या रोजगारावर टांगती तलवार निर्माण होत आहे. त्यांच्या मनात भीती आणि असंतोष वाढत आहे. मुंबईच्या दैनंदिन वाहतूक व्यवस्थेलाही अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे, असेही मत निरुपम यांनी व्यक्त केले आहे.

सक्ती व परीक्षा घेण्याचा निर्णय पुनर्विचार करून मागे घ्यावा

माझ्याकडे अनेक चालकांचे फोन येत असून, त्यांच्या व्यथा ऐकून मन अक्षरशः हेलावून जाते, त्यांच्या डोळ्यातील असुरक्षितता आणि भविष्याबद्दलची चिंता ही अत्यंत वेदनादाची आहे. याकरिता माझी आपणास विनंती आहे की, मराठी भाषेचा सन्मान अबाधित ठेवत. तुटक, कामचलाऊ मराठी समजणाऱ्या व बोलणाऱ्या चालकांना सवलत देण्यात याची आणि भाषा ज्ञानाची सक्ती व परीक्षा घेण्याचा निर्णय पुनर्विचार करून मागे घ्यावा. प्रेमाने शिकवलेली भाषा हृदयात घर करते, मप सक्तीने लादलेली भाषा मनात भीती निर्माण करते, आपण या विषयाकडे सहानुभूतीने, मानवतेच्या दृष्टीने आणि दूरदृष्टीने पाहून योग्य तो निर्णय प्याल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे मराठी भाषा सक्तीबाबत नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us