VIDEO : त्याची पत्नी-मुलं किंचाळत होते, मारु नका, पण नराधमाला पाझर फुटेना, भर रसत्यात अमानुष मारहाण

महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेच्या अक्षरश: चिंधळ्या उडताना दिसत आहेत. नेरळमध्ये एक इसम गाडीत बसलेल्या व्यक्तीला भर दिवसा अत्यंत अमानुषपणे मारहाण करतो. यावेळी पीडित व्यक्तीची पत्नी आणि मुलं मारहाण करणाऱ्याला विनवणी करतात, पण तरीही त्याला पाझर फुटत नाही. संबंधित व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ ठाकरे गटाकडून शेअर करण्यात आला आहे. मारहाण करणारी व्यक्ती ही शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. तर थोरवे यांनी तो आरोप फेटाळला आहे. पण मारहाण करणारी आणि पीडित व्यक्ती हे दोन्ही आपल्या पक्षाचे असल्याचं त्यांनी मान्य केलं आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ हा सुन्न करणारा आहे.

VIDEO : त्याची पत्नी-मुलं किंचाळत होते, मारु नका, पण नराधमाला पाझर फुटेना, भर रसत्यात अमानुष मारहाण
| Updated on: Sep 11, 2024 | 6:48 PM

महाराष्ट्रात सर्वसामान्य नागरीक सुरक्षितपणे जगू शकतात का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण महिला आणि अत्याच्याराच्या घटनांचा उद्रेक माजलेला असताना, आता भर रस्त्यात एका व्यक्तीला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. एक तरुण एका चारचाकी गाडीत बसलेल्या व्यक्तीला अतिशय अमानुषपणे मारहाण करत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. संबंधित व्हिडीओ हा सुन्न करणारा आहे. जो इसम मारहाण करत आहे त्याला पीडित व्यक्तीची लहान मुलं, पत्नी अक्षरश: याचना करत होत्या. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर डोळ्यांमधून अश्रू येतील इतका मन हेलावणारा, धक्कादायक आणि गुंडगिरीचा भीतीदायक व्हिडीओ आहे.

संबंधित व्हिडीओ शिवसेना ठाकरे गटाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. मारहाण करणारा व्यक्ती हा शिवसेना शिंदे गटाचा आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. पण महेंद्र थोरवे यांनी मारहाण करणारी व्यक्ती हा आपला बॉडीगार्डी नाही तर दोन्ही व्यक्ती हे आपल्याच पक्षाचे कार्यकर्ते असल्याचं महेंद्र थोरवे यांनी मान्य केलं आहे. ठाकरे गटाकडून करण्यात आलेले आरोप हे चुकीचे असल्याचं महेंद्र थोरवे यांनी म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओ:

ठाकरे गटाने नेमकं काय म्हटलंय?

“महाराष्ट्रात गुंडाराज! मिंधेंच्या आमदाराच्या, महेंद्र थोरवे ह्यांच्या ‘शिवा’ नावाच्या बॉडीगार्डने नेरळ येथे भर दिवसा, भर रस्त्यात एका व्यक्तीला मारहाण केली. त्या व्यक्तीची बायका मुलं रडत होती, पण कोणी मदतीला यायची हिम्मत केली नाही. कायद्याच्या चिंधड्या, लोकांचे हाल! ही फक्त कर्जतची अवस्था नाही, राज्यभरात गुंडगिरी वाढलीये! कायदा-सुव्यवस्थेची वाट लागलीये! कारण, गुंडांचा म्होरक्याच बेकायदेशीरपणे मुख्यमंत्रीपदावर बसलाय”, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

महेंद्र थोरवे यांची प्रतिक्रिया काय?

महेंद्र थोरवे हे शिंदे गटाचे कर्जतचे आमदार आहेत. त्यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली. “मारहाण करणारी व्यक्ती माझा बॉडीगार्ड नाही. ही चुकीची बातमी आहे. ठाकरे गटाने चुकीची माहिती पसरवली आहे. ठाकरे गटाने आम्हाला बदनाम करण्यासाठी हे कृत्य केलेलं आहे. आमचा या गोष्टीशी काहीही संबंध नाही. पण ते दोन्ही लोकं आमचेच आहेत. त्यांच्यात वाद झाले आहेत. पण माझा तो बॉडीगार्ड नाही. ते दोन्ही आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहे. त्यांनी जे काही चुकीचं कृत्य केलं असेल त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल”, अशी प्रतिक्रिया महेंद्र थोरवे यांनी दिली.