
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वारं वाहत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून, उमेदवारी अर्ज भरण्यास देखील सुरुवात झाली आहे. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार का? याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती, मात्र याचं उत्तर आता समोर आलं आहे. राज्यातील अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवरील मतांचं गणित लक्षात घेऊन सर्वच पक्ष आघाडी आणि युतीचा निर्णय घेत आहेत. कोल्हापूरच्या चंदगडमध्ये तर दोन्ही राष्ट्रवादी, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची युती झाल्याचं पहायला मिळत आहे. दरम्यान त्यानंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे सिंधुदुर्गमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कणकवलीमध्ये शिवसेना शिंदे गट आता थेट शिवसेना ठाकरे गटासोबत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युती करण्याची शक्यता आहे. कणकवलीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येणार आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते निलेश राणे यांनी त्याबाबत संकेत दिले आहेत.
आम्ही युती साठी सकारात्मक होतो. पण काही लोकांना आमच्यासोबत युती करायची नाही. काही जणांची आमच्यासोबत युती करण्याची इच्छा आहेत, तर आम्ही त्यांच्यासोबत युती करणार. आम्ही युतीसाठी प्रयत्न केले. राणे साहेबांनी सांगितल्यामुळे आम्ही थांबलो होतो, मात्र आता राणे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही मैदानात उतरलो आहोत. आमची ताकद मोठी आहे. आमच्या अस्तित्वाची चर्चा करणाऱ्यांनी तीन तारखेला आमचे फटाके पहावेत, असं थेट आव्हानच निलेश राणे यांनी भाजपाला दिलं आहे. त्यामुळे या निवडणुकीत आता निलेश राणे आणि भाजप नेते नितेश राणे आमने-सामने येण्याची शक्यता आहे. दरम्यान आज आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाकडून मालवनात जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत, त्यावेळी ते बोलत होते.