
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. सर्वच पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. जोदार प्रचार सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदारांना आपली भूमिका पटवून देण्याचा प्रयत्न महविकास आघाडी आणि महायुतीमधील प्रत्येक पक्षाकडून सुरू आहे. सोबतच पक्षांतराला देखील वेग आला आहे. यावेळी काही ठिकाणी निवडणुका या आघाडी आणि युतीमध्ये लढवल्या जाणार आहेत, तर काही ठिकाणी स्वबळाचा नारा देण्यात आला आहे, त्यामुळे या निवडणुकांसाठी इच्छुक असलेले नेते आणि पदाधिकारी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात असल्याचं पहायला मिळत आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते, मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, यावेळी शेतकऱ्यांना मिळालेल्या मदतीवरून त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. जालन्यामध्ये त्यांची पत्रकार परिषदे देखील झाली होती. मात्र आता त्याच जालन्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा दणका बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांनी शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या पक्षप्रवेशावेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांची देखील उपस्थिती होती.
आम्ही गावागावात शिवसेनेच्या शाखा काढल्या, जनतेचे अनेक प्रश्न सोडवले, प्रत्येक प्रश्नावर आंदोलनं केली. मी 90 मध्ये तिकीट मागितलं, 95 मध्ये मागितल परंतू प्रत्येक वेळी थांबायला लावलं. अनेक वर्ष मला भावी आमदार म्हणून मिरवून घेतल. 2014 मध्ये पक्षाने मला विधानपरिषद देतो, असं आश्वासन दिलं होतं. शेवटी जाता जाता महामंडळ दिल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर महामंडळ बरखास्त केल.अपमानजनक वागणूक दिली. यांच्या ताण तणावामुळे मला हृदय विकाराचा झटका आला, पण कोणीच आलं नाही, परंतु अर्जन खोतकर माझ्यासाठी धावून आले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मला फोन केला आणि तब्येतीची विचारपूस केली, असं यावेळी आंबेकर यांनी म्हटलं आहे.