
राहुल शेवाळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून देशभरातील सर्व विमानतळांवर भारतमातेची डिजिटल प्रतिमा बसवण्याची मागणी केली आहे. यामुळे राष्ट्रीय अभिमानात वाढ होईल आणि विमानतळांचे सौंदर्यही वाढेल, असा शेवाळे यांचा विश्वास आहे.
शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी नुकतंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात राहुल शेवाळे यांनी एक मागणी केली आहे. भारताचा समृध्द ऐतिहासिक वारसा, मूल्ये, संस्कृती आणि राष्ट्रप्रेमाचे प्रतीक असणाऱ्या भारतमातेची डिजीटल प्रतिमा देशभरातील सर्व विमानतळांच्या टर्मिनसवर बसवण्यात यावी, अशी मागणी माजी खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी केली आहे.
राहुल शेवाळे यांनी एक विस्तृत लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनाद्वारे राहुल शेवाळे यांनी ही मागणी केली आहे. या निर्णयाची अंलबजावणी करण्यासाठी संबंधित यंत्रणांना तातडीने सूचना देण्याची विनंती यामध्ये करण्यात आली आहे.
माजी खासदार शेवाळे यांनी आपल्या निवेदनात भारतीय इतिहासातील भारतमातेच्या प्रतिमेचे महत्व सांगितले आहे. भारतमाता म्हणजे जात, धर्म, भाषा यांच्या पलीकडे जाऊन देशवासीयांना एकत्र आणणारी माता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना देखील ब्रिटिशांविरुद्ध लढा देताना भारतमातेकडून प्रेरणा मिळाली होती. भारताचा समृद्ध ऐतिहासिक वारसा, अध्यात्म आणि ऐक्याचे प्रतीक म्हणजे भारतमाता, असे राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे.
देशभरातील विमानतळांवर दररोज मोठ्या संख्येने भारतीय आणि विदेशी प्रवासी ये-जा करतात. विमानतळांच्या टर्मिनसवरील दर्शनी भागात भारतमातेची डिजीटल प्रतिमा उभारून जगभरात एक वेगळा संदेश जाईल, असेही राहुल शेवाळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
या प्रतिमेमुळे राष्ट्रीय ऐक्य आणि भारतीयांचे राष्ट्रप्रेम, भारताचा समृध्द ऐतिहासिक वारसा आणि विविधतेतील एकता अधोरेखित करता येईल. तसेच, विमानतळांच्या सौंदर्यातही भर पडेल. या कल्पनेचे सर्व भारतीयांकडून स्वागत केले जाईल, असा विश्वासही शेवाळे यांनी व्यक्त केला.