
शिवसेनेचे विद्यमान खासदार संदीपान भुमरे यांच्या चालकाला बक्षीसपत्र म्हणून मिळालेल्या १५० कोटी रुपयांच्या जमिनीची चौकशी महसूल विभागाकडून केली जात आहे. यासंदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली आहे. ही एक गंभीर तक्रार असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश अतिरिक्त मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. संदीपान भुमरे यांच्या चालकाबद्दल तक्रार आलेली आहे. मोठी तक्रार आहे. त्यावर मी आमच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना मी याबद्दल तपास करण्यास सांगितला आहे. आजच माझ्याकडे तक्रार आली त्यामुळे मी निश्चित चौकशी करणार, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. यामुळे संदीपान भुमरे चालक प्रकरणी थेट महसूल विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
मंत्री आणि सध्याचे शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांचा चालक जावेद रसूल शेख याला हैदराबाद येथील सालारजंग कुटुंबातील एका सदस्याकडून छत्रपती संभाजीनगरमधील जालना रोडवर असलेली एक जमीन बक्षीसपत्र म्हणून मिळाली आहे. रेडी रेकनर दरानुसार या जमिनीची किंमत सुमारे १५० कोटी रुपये आहे. याच प्रकरणी भुमरे यांच्या चालकाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे.
परभणीचे वकील मुजाहीद खान यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आरोप केला आहे की, ही १२ एकर जमीन भुमरे आणि त्यांच्या आमदार मुलाने चालकाच्या नावावर खरेदी केली आहे. मुजाहीद खान यांच्या म्हणण्यानुसार, ‘हिबानामा’ (बक्षीसपत्र) हा रक्ताच्या नात्यातील व्यक्तीमध्येच कायदेशीर मानला जातो. मात्र, सालारजंग कुटुंबातील सदस्य आणि जावेद रसूल शेख यांच्यात कोणतेही नातेसंबंध नाहीत, तसेच ते इस्लामच्या दोन वेगवेगळ्या पंथांचे आहेत. त्यामुळे या व्यवहाराच्या कायदेशीर वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने चालक जावेद रसूल शेख याला चौकशीसाठी बोलावले आहे. त्याच्याकडून आयकर रिटर्न, उत्पन्नाचा स्रोत आणि त्याला ही जमीन कोणत्या आधारावर मिळाली, यासंबंधीची माहिती मागवण्यात आली आहे. ज्या सालारजंग कुटुंबातील सदस्यांनी हे बक्षीसपत्र दिले, त्यांनाही चौकशीत सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, परंतु अद्याप त्यांच्याकडून योग्य माहिती मिळाली नसल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने म्हटले आहे.
दरम्यान या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे संदीपान भुमरे यांनी स्पष्ट केले आहे. ही जमीन त्यांच्या चालकाच्या नावावर असून ‘हिबानामा’ हा एक कायदेशीर दस्तऐवज आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांचा चालक जावेद यांनी चौकशीला पूर्ण सहकार्य करत सर्व कागदपत्रे सादर केल्याचा दावा केला आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा आणि आता महसूल विभागाकडूनही सखोल चौकशी केली जात असून, या चौकशीच्या निष्कर्षांकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.