
Sanjay Raut on Chhatrapati Shivaji Maharaj Statue : “छत्रपती शिवरायांची टोलेजंग मूर्ती बनवण्याचे कंत्राट कोणी आणि कसं दिलं? आरोपी हा आपटे असला तरी मुख्य आरोपी आपटेला काम देणारा सूत्रधार आहे आणि तो ठाण्यातला आहे”, असा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सिंधुदुर्गातील मालवण परिसरातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. या घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या दुर्घटनेनंतर विरोधकही आक्रमक झाले आहेत. आता याप्रकरणी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
खासदार संजय राऊत यांनी नुकतंच मालवणमधील राजकोट किल्ल्याला भेट दिली. यावेळी त्यांनी राजकोट किल्ला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा कोसळलेला पुतळा या घटनास्थळाची पाहणी केली. यानंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. या शिल्पकाराला काम कोणी दिलं, कोणाच्या शिफारसीने दिलं, आपटे अचानक उपटले कसे याचा शोध आधी घ्या”, असेही संजय राऊत म्हणाले.
“अजून किती खोटं बोलणार आहात. तुमच्या पापाचं खापर भारताच्या नौदलावर टाकू नका. महाराष्ट्राच्या जनतेने हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहिलं आहे. या पुतळ्याचा शिल्पकार आपटे नावाचा एक माणूस आहे. जयदीप आपटे याला कामाचा अनुभवचं नव्हता. तो लहान लहान मूर्ती बनवायचा आणि त्याला छत्रपती शिवरायांची टोलेजंग मूर्ती बनवण्याचे कंत्राट कोणी आणि कसं दिलं? आरोपी हा आपटे असला तरी मुख्य आरोपी आपटेला काम देणारा सूत्रधार आहे आणि तो ठाण्यातला आहे. आपटेंना सुपारी कोणी दिली? आपटेंना सुपारी देणारा मुख्य गुन्हेगार आहे”, असे संजय राऊतांनी म्हटले.
त्याशिवाय इतका कमी अनुभव असलेल्या माणसाला सिंधुदुर्गातील ऐतिहासिक पुतळ्याचे काम कोणी देऊच शकत नाही. जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमधील या प्रकरणाचे जे सल्लागार मंडळ आहे, त्यांनी जाहीर केलेलं आहे की हा पुतळा बेकायदेशीर आहे. मुळात या पुतळ्याची रितसर मान्यता राज्यातील सांस्कृतिक महासंचालयनाकडून घेतलेली नाही. त्यांच्याकडून रितसर परवानगी घ्यावी लागते. यासंदर्भात कोणतंही काम केलेलं नसताना हा पुतळा बांधला. माझ्या माहितीनुसार, शिल्पकाराने मूळ परवानगी ही फक्त पाच फुटांचीच घेतली होती. पुतळा उंच बनवल्यानंतरही सरकारची परवानगी घेतली नाही, असेही संजय राऊत म्हणाले.
यात बरेच गुन्हेगार सहभागी आहेत. यात मोठा वरदहस्त असल्याशिवाय हे होऊच शकत नाही. यात ठाणे कनेक्शन आहे, हे मी वारंवार सांगतोय. या शिल्पकाराला काम कोणी दिलं, कोणाच्या शिफारसीने दिलं, आपटे अचानक उपटले कसे याचा शोध आधी घ्या, असेही संजय राऊतांनी म्हटले.
याप्रकरणी फक्त तक्रार दाखल झाली आहे. अजूनही रितसर गुन्हे नोंदवण्यात आलेले नाहीत. याप्रकरणी कोणालाही अटक झालेली नाही. कारवाई नाही, कोट्यावधीचा व्यवहार आहे. अशाप्रकारे समुद्रमार्गे एखादा अतिरेकीही घुसेल, यांना कळणारही नाही. हे स्वतच घुसवतील, या राज्याचे सरकार काहीही करु शकतं, असा आरोपही संजय राऊतांनी केला.