
महाराष्ट्रातील महायुती सरकारामध्ये सातत्याने नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात पालकमंत्रिपदांची घोषणा करण्यात आली. यावरुन अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरे यांची निवड झाल्यानंतर भरत गोगावले समर्थक आक्रमक झाले होते. तर नाशिकमध्येही दादा भुसे समर्थकांमध्ये नाराजी होती. यानंतर नवीन जीआर काढत नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपद निवडीला स्थगिती देण्यात आली आहे. आता खासदार संजय राऊत यांनी यावरुन गंभीर आरोप केले आहेत.
संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पालकमंत्रीपदाच्या निवड आणि त्यानंतर दिलेल्या स्थगितीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्टपणे भाष्य केले. “पालकमंत्रिपदावर दिल्लीतून स्थगिती आणली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशात असताना मोठी खेळी करण्यात आली”, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
“पालकमंत्रीपदासाठी लढाई हे बिनडोकपणाचे लक्षण आहे. मुख्यमंत्री हतबल झाले आहेत. मुख्यमंत्री परदेशात असताना दिल्लीतून दबाव आणून पालकमंत्रीपदावर स्थगिती आणली. हा मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे. पालकमंत्री पदासाठी टायर जाळले गेले. हे धमक्या देणे सुरू आहे”, असे संजय राऊत म्हणाले.
“आज प्रजासत्ताक दिन आहे. राष्ट्रपतींचे भाषण ऐकल. संविधान हा शब्द उरला आहे का? समता बंधुता हे शब्द फक्त राष्ट्रपतींच्या भाषणात होते. निवडणुकीच्या काळात संविधांनावर हल्ला होतो. राज्याचा निकाल आजही मान्य नाही. मतदान आणि निकाल यात मोठी तफावत पाहायला मिळत आहे. मतदान वाढले त्याची नोंदणी कुठं आहे. एक मताने निवडणूक जिंकते – हारते. निवडणूक आयोग बोलत नाही, संविधान कुठे आहे? अमित शाह यांनी मेरा बुथ बलवान असा नवा नारा दिला आहे. निवडणूक पारदर्शक होत नाही. संविधान आहे कुठं हे फक्त नावाला आहे. आम्ही संविधान बचाव ह्यासाठी प्रयत्न करत आहे”, असे संजय राऊत म्हणाले.
“मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्री यांना शब्द दिला असावा म्हणून ते काही काळ शांत आहेत, असं आम्ही मानतो”, असे संजय राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी नितेश राणेंवरही भाष्य केले. “कोण बिनडोक त्यावर बोलायचं नाही. नामर्द यांच्या हातात सत्ता गेली. सत्तेमुळे बिनडोक होता. हे सरकार आल्यापासून तोडफोडवाले चित्रपट आले. मी पण चित्रपटांचा जाणकार आहे. इंदिरा गांधी यांना मारायला बॉम्बचा कारखाना बनवला गेला होता. आज कोणी धमकीचा संदेश देत त्यावर सरकारची पळापळ होते. आम्ही इमर्जन्सी चित्रपट पाहिला. इंदिरा गांधी यांना बाळासाहेब ठाकरे यांनी समर्धन दिले होते”, असे संजय राऊतांनी म्हटले.
“सर्वच मुख्यमंत्री हे दावोस दौऱ्याला जातात. एकनाथ शिंदे यांनी ही पंधरा लाख कोटींचे करार आणले होते. तिकडे जाऊन करार करणे म्हणजे गुंतवणूक नाही. करार झालेल्या कंपन्या आपल्याच देशातील आहेत. त्यासाठी दाओसला जाण्याची काय गरज”, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.