
कंगना रणौतचा बहुचर्चित इमर्जन्सी हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा फार कमी प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटात इतिहासाची मोड-तोड केल्याचे बोललं जात आहे. यावरुन आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना रोखठोकमधून टीका करण्यात आली आहे. “इंदिरा गांधी हे असामान्य व्यक्तिमत्त्व होते. आज जो भारत देश उभा आहे, त्याची पायाभरणी पंडित नेहरूंनंतर इंदिरा गांधी यांनीच केली. कंगना राणावत या नटीने इंदिराजींना खलनायिका ठरवणारा `इमर्जन्सी’ हा चित्रपट काढला. बॉक्स ऑफिसवर तो साफ कोसळला. हीच इंदिरा गांधींची ताकद!”, अशा शब्दात संजय राऊत यांनी खडे बोल सुनावले
“कंगना राणावत हिचा `इमर्जन्सी’ हा सिनेमा आल्या आल्याच बॉक्स ऑफिसवर कोसळला, हे बरे झाले. खरा इतिहास नष्ट करायचा विडा काही लोकांनी उचलला आहे. सत्य झाकले जात आहे. काही महाविद्वान लोक सिनेमाच्या माध्यमातून आपल्या मर्जीनुसार इतिहासाचे पुनर्लेखन करीत आहेत. कंगना राणावत या भाजपच्या गोटात आहेत व मोदींच्या अंधभक्त महामेळाव्यात त्या ब्रॅण्ड अॅम्बेसेडर असल्याने त्यांनी `इमर्जन्सी’ चित्रपटात इंदिरा गांधी यांना खलनायिका ठरवले आहे आणि त्या काळाचा संपूर्ण इतिहास मोडून-तोडून सादर केला आहे”, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
“इंदिरा गांधी यांना खलनायिका ठरवणे ही भारतीय इतिहासाची क्रूर थट्टा आहे. ज्यांनी देशाच्या जडणघडणीत काहीच योगदान दिले नाही, असे आजचे सत्ताधीश व त्यांचे आंधळे अनुयायी हे सर्व करत आहेत. भारताचा एक भाग असलेल्या मुंबईस (जी महाराष्ट्राची राजधानी व देशाची आर्थिक राजधानीदेखील आहे) मिनी पाकिस्तान म्हणणाऱ्या कंगना राणावतसारख्यांना त्यांची जागा दाखविण्यासाठी इंदिरा गांधी यांनी तेव्हा आणीबाणी लावली हे सत्य आहे. राष्ट्रीय सुरक्षेची गरज म्हणून लावलेल्या आणीबाणीस 50 वर्षे होऊन गेली. तरीही काही लोक ती राख अंगाला फासून फिरत आहेत. पोलिसांनी व सैन्याने सरकारचे आदेश पाळू नयेत असे जयप्रकाश नारायण, चरणसिंगांसारखे नेते जाहीर सभांतून चिथावणी देत होते.
जॉर्ज फर्नांडिस यांनी तर `बॉम्ब’ बनविण्याचा कारखानाच काढला होता. आज पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात व्यंगचित्र काढले म्हणून देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो. राजकीय विरोधकांना खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात डांबले जाते. हे आणीबाणीचेच नवे रूप आहे. जॉर्ज यांना इंदिरा गांधींना बॉम्बने उडवायचे होते व त्याची प्रात्यक्षिके सुरू होती. आज पंतप्रधान व एखाद्या मुख्यमंत्र्यास निनावी धमकीचा फोन आला, पत्र आले तरी संशयावरून लोकांना तुरुंगात सडवले जाते. आणीबाणीत स्मगलर्स, काळाबाजारी, गुंड यांना तुरुंगात डांबले हे कंगना राणावत यांनी सिनेमात दाखवले नाही. देशाला शिस्त लावणे व अराजकवाद्यांना वठणीवर आणणे यासाठी आणीबाणी होती”, असेही संजय राऊत म्हणाले.
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी व आणीबाणीचे समर्थन केले होते. तरीही भाजप व शिवसेना 25 वर्षे एकत्र नांदले, सत्ता भोगली त्याचे काय? इंदिरा गांधींची प्रतिमा मलिन करणारे असे चित्रपट व निर्मात्यांना सर्वच पक्षांच्या नेत्यांनी जाब विचारायला हवा. इंदिराजींचे नेतृत्व कणखर व पोलादी होते. देशातील आधारभूत परिवर्तनाच्या त्या नायिका होत्या. आजचा विकास म्हणजे इंदिराजींनी केलेल्या पायाभरणीचे फळ आहे. इंदिरा गांधी यांनी संस्थानिकांचे तनखे एका झटक्यात बंद केले. आज नवे संस्थानिक निर्माण झाले व त्यांच्यावर सरकारी कृपेचा वर्षाव होत आहे. गौतम अदानी यांना तर `महाराजा’चा दर्जा मिळाला आहे. असे अनेक महाराज आणीबाणीत तुरंगात जाऊन पडले होते व त्यामुळे लोक खूश होते”, अशी टीका संजय राऊतांनी केली.
“इंदिरा गांधींच्या कार्याचे मूल्यमापन एका `आणीबाणी’वर तोलता येणार नाही. त्यांचे महानपण त्यांच्या बेडरपणात होते. राष्ट्रीय सुरक्षेला व सार्वभौमतेला धोका निर्माण झाला हे पटताच त्यांनी सुवर्ण मंदिरात रणगाडे, सैन्य घुसवून भिंद्रनवाले व त्यांच्या अतिरेकी फौजांना खतम केले. परिणामांची पर्वा त्यांनी केली नाही व शेवटी याच कारवाईची किंमत चुकवत पंतप्रधानपदी असताना त्यांनी देशासाठी हौतात्म्य पत्करले. शीख समाज आपल्या विरोधात गेलाय हे माहीत असतानाही त्यांनी आपले शीख अंगरक्षक बदलले नाहीत. काय हे धैर्य! मणिपूरच्या हिंसाचाराला व मनुष्यसंहाराला सामोरे न जाणाऱ्या पंतप्रधानांचे अनुयायी आज इंदिरा गांधी यांच्यावर चिखल उडवीत आहेत.
आणीबाणी हा एक अध्याय होता. त्यास दोन बाजू आहेत. पण त्यासाठी इंदिरा गांधींना खलनायिका ठरवणारे चित्रपट प्रदर्शित करणे राष्ट्रीय अपराध आहे. कंगना राणावतचा `इमर्जन्सी’ चित्रपट साफ कोसळला. कारण देशाचा आत्मा जिवंत आहे!”, असेही संजय राऊत म्हणाले.